उद्यापासून अंमलबजावणी, रेल्वे भाड्यातही वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला असून १ जुलै २०२५ पासून तात्काळ तिकीट बुकिंगसह चार्ट तयार करण्याच्या वेळेत आणि रेल्वे भाड्यातही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. रेल्वे प्रवाशांचा आरक्षण चार्ट हा प्रवासाच्या आधी 8 तास जाहीर केला जाणार आहे. तो आधी प्रवासाच्या 4 तास जाहीर केला जायचा. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना त्याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग निवडण्यासाठीही पुरेसा वेळ मिळणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावांना मंजुरी देत संबंधित अधिका-यांना अंमलबजावणीसाठी निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना तिकीट कन्फर्म होणार की नाही याची माहिती लवकर मिळेल आणि इतर पर्याय निवडण्यास वेळ मिळेल. यासोबतच रेल्वेचे तात्काळ तिकीट फक्त आधार लिंक यूजर्ससाठीच असणार आहे. १ जुलैपासून तात्काळ तिकिटे आधार लिंक असलेल्या आयआरसीटीसी खात्यांवरच बुक करता येणार आहेत. याची आता प्रवाशांना नोंद घ्यावी लागणार आहे.
रेल्वे भाड्यात वाढ
नॉन-एसी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रतिकिमी १ पैसा आणि एसी क्लासमध्ये प्रतिकिमी २ पैसे भाडेवाढ होणार आहे. या भाडेवाढीचा ५०० किमीपर्यंत द्वितीय श्रेणी आणि एमएसटी प्रवाशांना कोणताही परिणाम होणार नाही.