26.4 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeलातूररेल्वे मार्गाचा प्रश्न अधिवेशनात मांडावा

रेल्वे मार्गाचा प्रश्न अधिवेशनात मांडावा

जळकोट : प्रतिनिधी
लातूर रोड जळकोट बोधन हा रेल्वेमार्ग सन २०१६ यावर्षी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केला होता. या रेल्वे मार्गास मंजूर होऊन तब्बल दहा वर्षे झाले आहेत, असे असले तरीही या रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही. उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे आता तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आमदार संजय बनसोडे या रेल्वेमार्गाचा मुद्दा उपस्थित करतील. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून आणतील अशी अपेक्षा जळकोट तालुक्यातील जनतेला आहे .

जळकोट शहराच्या अगदी जवळून जाणा-या लातूर रोड ते बोधन हा रेल्वे मार्ग केंद्र शासनाच्या यादीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग म्हणून नोंद आहे. हा रेल्वे मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या आखत्यारीत येतो. या रेल्वे मार्गाचे अंतिम लोकेशन सर्वे हा पूर्ण झालेला आहे . या रेल्वे मार्गाचा मार्गही निश्चीत झाला आहे. लातूर रोड-जळकोट -मुखेड – बोधन हा रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. थेट कोकण ते विशाखापटनम ही दोन बंदरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. निजामाच्या काळातही या रेल्वेमार्गाचा सर्वे झाला होता परंतु हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. यानंतर या रेल्वे मार्गाची उभारणीसाठी पाठपुरावा सुरूच असल्यामुळे हा रेल्वे मार्ग २०१६ साली मंजूर झाला आहे. याच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आली. या रेल्वेमार्गासाठी साधारणपणे २५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे .

पहिल्या टप्प्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये हा रेल्वेमार्ग १३४ किलोमीटर लांबीचा होणार आहे. यासाठी २४०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने हा सर्वे करण्यात आला. बोधन येथून मुखेड, जळकोट मार्गे पुढे चाकूर जवळ हा रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे .लातूर रोड जळकोट बोधन या रेल्वे मार्गासाठी ७३२ हेक्­टर एवढी जमीन लागणार आहे. या मार्गावर जवळपास ९३ पूल होणार आहेत. यातील पंधरा पूल हे मोठे आहे तर ७८ पुल छोटे आहेत. या रेल्वेमार्गाचा एका किलोमीटरसाठी १७ कोटी ९१ लाख रुपयाचा निधी लागणार आहे . हा सर्व आराखडा तयार करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गाचे काम आतापर्यंत सुरू झाले असते परंतु राज्य सरकारकडून या रेल्वेमार्गासाठी अर्धा वाटा उचललेला नाही.

उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी या रेल्वे मार्गाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून यासाठी निधी उपलब्ध करून घेणे खूप गरजेचे आहे. असेच राज्य सरकार दुर्लक्ष करीत राहल्यिास हा रेल्वे मार्ग कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. यामुळे आता या भागाचा आमदार म्हणून संजय बनसोडे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जळकोट तालुक्यातील नागरिकाकडून केली जात आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR