मुंबई हायकोर्टाने लोकल रेल्वेला सुनावले
मुंबई : प्रतिनिधी
येथील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ ९ जून रोजी लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूबाबत मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या १५ वर्षांत मृत्यूची संख्या ४६ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासन करीत असले तरी रोज १० प्रवाशांचा मृत्यू होणे चिंताजनक आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी काय उपाययोजना करणार आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून करणार, हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. एवढेच नव्हे तर उपाययोजनांची अंमलबजावणी केले जाते का, यावर न्यायालय देखरेख ठेवेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
लोकल प्रवासादरम्यान विविध कारणांनी होणारे मृत्यू रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक परिणामकारक उपाययोजना केल्या आहेत, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला. त्यावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने रेल्वेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विसंगतीवर बोट ठेवत दिवसाला १० प्रवाशांना लोकल प्रवास करताना जीव गमवावा लागणे चिंताजनक आहे. आता लोकलमधून पडून मृत्यू होणार नाही, यासाठी काय करणार, याचे स्पष्टीकरण पुढील सुनावणीपर्यंत द्यावे, असे आदेश दिले. तसेच याचिकाकर्त्यांनी मृत्यू रोखण्यासाठी सूचवलेल्या शिफारशी विचारात घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.