मुंबई : प्रतिनिधी
पवईतील आर. ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या ओलीस नाट्यामुळे मुंबई हादरली. थकबाकीपोटी रोहित आर्याने लहान मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी मुलांची यशस्वी सुटका केली, पण चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक मराठी कलाकारांची चौकशी होणार असून, मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
गेल्या आठवड्यात गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी मुंबईत मोठी खळबळ माजली.
कारण पवईतील आर. ए. स्टुडिओमध्ये काही लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. शिक्षण विभागासाठी केलेल्या कामानंतर पैशांच्या थकबाकीमुळे रोहित आर्या या इसमाने ऑडिशनचा घाट घालत काही मुलांना बोलावलं होतं, आणि त्यांच्यापैकीच काही जणांना ओलीस ठेवत त्याने अनेक मागण्या केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी वॉशरूममधून प्रवेश करून १७ मुलांसह एकूण १९ जणांची सुटका केली. आणि चकमकीदरम्यान रोहित आर्याचा गोळी लागून मृत्यू झाला.
या ओलीस नाट्यामुळे फक्त मुंबईच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरला असून याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होते आहेत, काही अपडेट्सही समोर येत आहेत. एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या रोहित आर्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही नुकताच समोर आला आहे. जे. जे. रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. रोहित आर्याचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला. त्या गोळीचे स्वरूप पाहता त्याच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असे त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
रोहित आर्याच्या एन्काऊंटरप्रकरणी मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणात आर. ए. स्टुडिओला गेलेल्या, रोहित आर्याची भेट घेतलेल्या कलाकारांचीसुद्धा चौकशी होणार आहे. रोहित आर्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदवला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
ऋचिता जाधवशीही साधला होता संपर्क
याच आर. ए. स्टुडिओत ऋचिता जाधव या अभिनेत्रीलाही बोलवलं होतं अशी माहिती समोर आली होती. एक चित्रपट करायचा असून त्यासाठी ऑडिशन ठेवण्यात आल्याचे रोहितने भासवले. त्याच कटाचा भाग म्हणून त्याने अभिनेत्री ऋचिता जाधव हिच्याशीही संपर्क साधला होता.

