23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी

रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून, राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आतापर्यंत दोन वेळा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या निधनावर घातपाताचा संशय व्यक्त केला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले असून या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मला रोहितची काळजी वाटत आहे. आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित अनेक मुद्दे मांडत आहे. रोहित पवार हे जनतेच्या मनातील शंका उपस्थित करत आहेत. प्रसारमाध्यमातून आणि वर्तमानपत्रातून तसेच लोकांच्या समोर रोहित ज्या भावना मांडतोय, जी वस्तुस्थिती मांडतोय, डेटा दाखवतोय ते पाहता अनेकांना त्याची काळजी वाटत आहे. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, त्यांनी रोहित यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, रोहितला सुरक्षा मिळणं गरजेचं आहे अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अनेक शंका-कुशंका व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका तो उपस्थित करीत आहे. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR