मुंबई : रोहित पवारांनी राजकीय भाषा वापरणे बंद केले पाहिजे. रोहित पवार हा फार छोटा माणूस आहे. निवडणूक आयोगाच्या विषयाची चर्चा देशभरात सुरू आहे. निवडणूक आयोगाबद्दल शंकेचे वातावरण असू नये ही प्रत्येकाची इच्छा असते. ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्याला केंद्र सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कोणाची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची डॉनसोबत तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. तुमच्या विजयी रॅलीमध्ये लोकं पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचत होते मग तुम्ही पाकिस्तानचे एजंट आहे का तर तुम्ही काय बोलणार.. प्रश्नांचे गांभीर्य ओळखत माणसाने बोलले पाहिजे. निवडणूक आयोग, राष्ट्रपती यांना संविधानाच्या चौकटीतच काम करावे लागेल. ठाकरेंनी ‘मातोश्री’ सोडून किमान दादरपर्यंत तरी जावे, आम्ही लोकांच्या बांधावर जात आहोत, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
दोन दिवसांमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता
संजय शिरसाट म्हणाले की, शेतक-यांना दिलासा देण्याची गरज असल्याने प्रत्येकाने बांधावर जात परिस्थितीचा आढावा घ्यायचा असे मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. यातच सरकार शेतक-यांच्या सोबत आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वा-यावर सोडणार नाही, म्हणून प्रत्येक मंत्री बांधावर जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना धीर दिला असून दोन दिवसांमध्ये त्यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. आम्ही सरसकट पंचनामे करणार आहोत.
शेतक-यांना कमी लेखू नका
संजय शिरसाट म्हणाले की, शेतक-यांना कमी लेखू नका, त्यांनी काय कायम फाटके कपडे घालायचे का? तो शेतकरी राजा आहे ना? त्यांच्या अंगावरचे चांगले कपडे सुद्धा रोहित पवारांना पाहवत नाहीत का? शेतक-यांच्या भावना आणि वेदना समजून घेताना काही ठिकाणी सुरक्षेचा भाग म्हणून बॅरिकेड लावले तर त्यामध्ये काही गैर नाही. शेतकरी गरीबच दिसला पाहिजे म्हणून तशा कपड्यात फोटो काढायचे असतील तर विरोधकांनी तसे फोटो काढावे. पण शेतकरी आनंदी असला पाहिजे.
रोहित पवारांनी आमच्यासोबत यावे
संजय शिरसाट म्हणाले की, आचारसंहिता लागली म्हणून आम्ही शेतक-यांसाठी काही करायचे नाही का? शेतक-यांना मरू द्यायचे का.. काही निर्णयांसाठी आचारसंहिता नसते हे रोहित पवारांनी समजून घेतले पाहिजे. रोहित पवारांनी आमच्यासोबत यावे.
















