जळगाव : प्रतिनिधी
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याच्या दराने उच्चांक गाठले आहेत. जळगावमधील सुवर्णनगरीत सोन्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख ३४ हजार ४१५ रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून स्थिर असणा-या चांदीच्या दरात किरकोळ घट पाहायला मिळाली. चांदीचे दर १०० रुपयांनी घसरले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला झुंबड उडाली आहे. सोन्याचे दर वाढले आहेत, पण तरीही खरेदीदाराचा उत्साह मात्र कायम आहे. मागील १२ तासांत सोन्याच्या दरामध्ये ३ हजार ३०० रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. सुवर्णनगरीत सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ३४ हजार ४१५ रुपयांवर पोहोचले आहेत.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफ दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र जळगावसह राज्यात पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी भाववाढ झाल्यामुळे बजेट कोलमडले असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी यावेळी व्यक्त केल्या. आज सोन्याच्या दरात आणखीन वाढ होऊ शकते असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.


