विधानसभा अध्यक्षांचा मुख्य सचिवांना इशारा
मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन संपत आले तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तरे अद्याप प्रलंबित आहेत. त्यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही त्याला प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्ष्यवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा राहुल नार्वेकर यांनी दिला.
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष्यवेधींच्या प्रलंबित मुद्यांचा प्रश्न सभागृहात मांडला. काही लक्ष्यवेधी या सभागृहात मांडल्या जातात तर काही लक्ष्यवेधींची उत्तरे ही शेवटच्या दिवशी सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात, अशी प्रथा आहे. पण गेल्या काही अधिवेशनापासून ही प्रथा दिसत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी या आधी ३० सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले होते. त्यानुसार १२९ लक्ष्यवेधी सूचनांची निवेदने प्राप्त आहेत. ३२९ स्वीकृत लक्ष्यवेधींपैकी २९२ निवेदने प्राप्त आहेत. उर्वरित लक्ष्यवेधींची उत्तरे देण्यात आली नाहीत.
कारवाईचा दिला इशारा
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिका-याला जर असे वाटत असेल की विधीमंडळाच्या पीठासन अधिका-याने दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही तर त्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्ष्यवेधींची उत्तरे आली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल.

