पिंपरी-चिंचवड : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाच्या झळा आता थेट महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशाला आणि आनंदाच्या क्षणांनाही बसू लागल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आगामी दोन महिन्यांत तब्बल १० हजार विवाह सोहळे नियोजित आहेत. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे या लग्नांमधील ‘जेवणावळीं’वर मोठे संकट ओढवले आहे. गॅसअभावी ४५० हून अधिक केटरर्सनी आपल्या ऑर्डर्स रद्द करायला सुरुवात केल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांची प्रचंड धावपळ उडाली आहे.
जेवणाचे दर वाढणार
गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे केटरर्स आता मिळेल त्या किमतीत गॅस शोधत आहेत. काळ्या बाजारात गॅसचे भाव गगनाला भिडल्याने, अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी केटरर्सनी जेवणाच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटचे गणित पूर्णपणे बिघडले असून, अनेक कुटुंबे लग्नसोहळे पुढे ढकलण्याबाबत विचार करत आहेत.
४५ हजार कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार
ही परिस्थिती केवळ लग्नसोहळ्यांपुरती मर्यादित नसून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे ४५ हजार कामगारांच्या रोजगारावरही आता टांगती तलवार आहे. गॅस नसल्याने अनेक ठिकाणी लग्नकार्यासाठीच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत. आनंदाच्या या दिवसांत निर्माण झालेल्या या गॅससंकटाने पिंपरी-चिंचवडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

