21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeलातूरलघुपटासारख्या कलाकृतींमधून होणारे समाज प्रबोधन अतिशय महत्त्वाचे

लघुपटासारख्या कलाकृतींमधून होणारे समाज प्रबोधन अतिशय महत्त्वाचे

लातूर : प्रतिनिधी
लघुपटासारख्या कलाकृतींमधून होणारे समाज  प्रबोधन अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अमोल  तांबे यांनी केले.  दयानंद शिक्षण संस्था व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या  तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म  फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी लातूरचे पोलिस अधीक्षक   अमोल तांबे प्रमुख अतिथी म्हणून  बोलत होते.
कार्यक्रमास दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन  लाहोटी, सचिव  रमेश  बियाणी, शैक्षणिक विकास अधिकारी डॉ. जयप्रकाश दरगड तसेच दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मानिकर, कार्यक्रमाचे प्रायोजक आदित्य सोनवण, दयानंद कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना  अमोल तांबे म्हणाले की, पूर्वी फिल्मनिर्मिती ही काही मोजक्या कुटुंबांपुरती मर्यादित होती; मात्र आज प्रत्येकाला संधी उपलब्ध आहे. समाजातील छोट्या-छोट्या विषयांवर आधारित फिल्म्समधून जनजागृती व समाजप्रबोधन करता येते. विविध गुन्हेगारी घटनांवर आधारित चित्रपट तयार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
पोलिस अधीक्षक  अमोल तांबे यांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रायोजक आदित्य सोनवणे यांनी केले. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी यांचे स्वागत अभिजात फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष  धनंजय कुलकर्णी यांनी, तर सचिव   रमेश  बियाणी यांचे स्वागत दयानंद कला महाविद्यालयाच्या अ‍ॅनिमेशन विभाग प्रमुख व अभिजात फिल्म सोसायटी समिती सदस्य डॉ. दुर्गा शर्मा यांनी केले. या फिल्म फेस्टिवलमध्ये १२ वेगवेगळ्या देशांतून २५० शॉर्ट फिल्म्स दाखल झाल्या असून त्यामध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, व्हिडिओ साँग व अ‍ॅनिमेशन अशा प्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी निवडक १०० फिल्म्स तीन दिवसांत प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या फिल्म्सचे परीक्षण जागतिक दर्जाच्या परीक्षकांमार्फत करण्यात आले असून यामध्ये सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक  संतोष पठारे व फिल्म निर्देशक   नीलेश कुंजीर यांचा समावेश आहे. निवड झालेल्या उत्कृष्ट फिल्म्सना फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन  लाहोटी व सचिव   रमेश  बियाणी यांनी फेस्टिवलसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार अभिजात फिल्म सोसायटीचे सचिव डॉ. स्वप्निल देशमुख यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वप्निल देशमुख, धनंजय कुलकर्णी, डॉ. दुर्गा शर्मा,  आदित्य कुलकर्णी,  प्रथमेश जाधव,  अभिषेक बुचके व डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. दयानंद कला महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशन विभागातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून मोलाची भूमिका बजावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR