महामार्ग बंद, अनेक वाहने बर्फाखाली अडकली
लेह : वृत्तसंस्था
लडाखमधील जोजिला भागात भीषण हिमस्खलन झाल्याने श्रीनगर-लेह मार्गावर मोठी दुर्घटना घडली. या हिमस्खलनामुळे बर्फात अडकून ७ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनाचा फटका अनेक वाहनांना बसला. अनेक वाहने कमी-अधिक प्रमाणात बर्फात अडकली. तसेच महामार्गही बंद झाला.
शुक्रवारी दुपारी झालेल्या हिमस्खलनानंतर किमान १५ वाहने बर्फाखाली दबली. यानंतर प्रशासनाने बचाव अभियान हाती घेतले. यामध्ये पोलिस, लष्कर, सीमा रस्ते संघटना, एसडीआरएफ आणि सोनमर्ग, द्रासचे जिल्हा प्रशासन सहभागी झाले. रस्ता मोकळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मशिन्सचा वापर करुन बर्फ हटवण्याचे काम सुरु आहे. जोजिला परिसरात शुक्रवारी दुपारी कॅप्टन-टर्नच्या जवळ महामार्गावरुन वाहतूक सुरू असताना हिमस्खलन झाले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. अनेक वाहने बर्फाखाली अडकली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याचे द्रासचे उपविभागीय मॅजिस्ट्रेट विशाल अत्री यांनी सांगितले.
या भीषण दुर्घटनेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिका-यांनी व्यक्त केली. काही वाहने बर्फात पूर्णपणे अडकली आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी बचाव कार्य सुरु आहे. दुपारी १ पासून बचाव कार्य सुरु करण्यात आले.

