पाकमध्ये अज्ञाताचा थरार, शेख युसुफ आफ्रिदीचा खात्मा
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये सध्या अज्ञातांची दहशत वाढली आहे. हल्ला करणारी व्यक्ती दहशतवाद्यांसाठी अक्षरश: कर्दनकाळ ठरत आहे. कुण्या एका बंदूकधा-यांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा रविवारी गोळ््या घालून गेम ओव्हर केला. युसूफ हा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लष्करच्या नेटवर्कचा ब्रँच हेड होता. यमदूत बनून आलेल्या या अज्ञात हल्लेखोरांनी युसूफचा क्षणात खात्मा केला.
पाकिस्तानात अलिकडे अज्ञात हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी अतिरेक्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. विशेष म्हणजे हल्ले करणारे अज्ञात नेमके कुठून येतात आणि कुठे गायब होतात, हे अद्याप समजू शकलेले नाही. पाकिस्तानात अतिरेक्यांचे नेटवर्क मोठे असून, पाकिस्तानने या अतिरेक्यांना आश्रय दिलेला आहे. शेजारी देशांच्या विरोधात कुरापती करण्यासाठी या अतिरेक्यांचा वापर केला जातो. विशेषत: भारताविरोधात या अतिरेक्यांना फूस दिली जाते. त्यांच्या माध्यमातून सीमा भागात अस्थिरता निर्माण करण्याचा नेहमीच पाकिस्तानचा प्रयत्न असतो. परंतु अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानातच अतिरेक्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आता त्यांच्यावर अचानक हल्ले होत आहेत. तसाच प्रकार पुन्हा पाकिस्तानात झाला. पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वापासून ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत कारस्थाने रचणारे दहशतवादी आता कुठेही सुरक्षित नाहीत, असेच चित्र दिसत आहे.
जानेवारी २०२६ पासून
३० कमांडर्सचा खात्मा
२०२६ पासून पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या ३० हून अधिक टॉप कमांडर्सचा खात्मा झाला आहे. याच एप्रिल महिन्यात हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा याचाही लाहोरमध्ये गोळ््या घालून अज्ञातांनीच खात्मा केल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले.

