26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी’ मुळे राज्याला मोठा आर्थिक फटका

‘लाडकी’ मुळे राज्याला मोठा आर्थिक फटका

भुजबळांचे मोठे विधान

मुंबई : प्रतिनिधी
नुकताच छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठे भाष्य केले. छगन भुजबळांनी म्हटले की, लाडकी बहीण जी योजना आहे ती ३५-४० कोटींवर जाते. तेवढे पैसे आपल्याला काढायचे म्हटले की, सगळीकडेच याचा फटका बसतो.

त्यामध्येच राज्यामध्ये प्रचंड पाऊस त्यामुळे शेतीची मोठी हानी झाली, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे. निश्चितपणे यामुळे निधीची ओढाताण होत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना फटका बसत आहे. इतर काही गोष्टी करणे शक्य नाही. आमच्या विभागातर्फे दहा किलो तांदूळ आणि गहू वाटप केला जातो आणि ते वाटप आम्ही सुरू केले आहे. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यांना सरकार पाच हजार रूपये मदत देते आहे. बाकी पंचनामे करून भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आहे. शेतक-यांचे प्रश्न अगोदर सोडवावे लागतील.

पुढे छगन भुजबळांनी म्हटले की, शिवभोजन थाळीच्या निधीसाठी आम्हाला फार जास्त प्रयत्न करावे लागतात, हे खरं आहे. आनंदाच्या शिधाबाबत अर्थखात्याने स्पष्ट सांगितले की, यावेळी शक्य नाही. ३५० कोटी एका शिधेचा खर्च जातो. सर्व खात्यांना निधीची कमतरता झाली आहे हे मी सांगू शकतो. अजित पवारांनीही सांगितले की, पैशांचे सोंग करता येत नाही. पैसे वाढले की, कुठेतरी या गोष्टी घडतात आणि ओढाताण होते.

निधीबाबत ओढाताण होतच राहणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट म्हटले. दिवाळीमध्ये भेटणारी आनंदाची शिधा यंदा मिळणार नसल्याने सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामध्येच आता छगन भुजबळ यांनी यावर थेट भाष्य केले. शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना अगोदर मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबत लाडकी बहीण योजनेचा फटका इतर विभागांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले.

शिवभोजन थाळीचा पूर्ण निधी अजून मिळाला नसल्याचे खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे. लाडकी बहीण योजनेवर अधिक पैसा खर्च होत असल्याने इतर विभागांना निधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेला आपल्या विभागाचा निधी वळवण्यात आल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्येच आता छगन भुजबळ देखील यावर बोलताना दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR