लातूर : प्रतिनिधी
अभिजात फिल्म सोसायटी व दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा अभिजात आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव दि. १६, १७ व १८ डिसेंबर रोजी लातूर येथील दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नावाने या महोत्सवातील विजेत्या लघुपटास प्रथम पारितोषिक देण्यात येणार असून लघुपट निर्मितीच्या इतर एकूण २५ विभागात वेगवेगळी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत माहितीपट, अॅनिमेशन आणि व्हिडीओ सॉंग्सचा देखील समावेश असणार आहे. यंदा भारत, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, जर्मनी, स्पेन, इटली, रशिया, मलेशिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, सौदी अरेबिया आणि इराण इत्यादी देशातून मराठी, हिंदी, इंग्रजी, मालवणी, तेलुगू, तमिळ, बंगाली, कन्नड, आसामीस, मल्ल्याळम, पंजाबी, राजस्थानी, इटालियन, जर्मन, टर्किश, स्पॅनिश, चायनिज(कँटोनीज), रशियन, कॅटलन, फ्रेंच या भाषांमधून सुमारे २५० लघुपटांनी सहभाग नोंदवलेला असून यातील निवडक ८० लघुपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे परिक्षक म्हणून संतोष पाठारे आणि रघुनाथ फडणीस हे ज्येष्ठ समीक्षक काम बघणार आहेत.
या महोत्सवात लघुपट निर्मिती तंत्राबरोबरच इतर विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने व परिसंवाद देखील होणार आहेत. लघुपटनिर्मितीसाठी इच्छुक लेखक-दिग्दर्शकांसाठी निर्मिती सहकार्य करण्यासाठी व त्यांच्या संकल्पनांना पाठबळ देण्यासाठी ‘पीच टँक’ हा आगळा उपक्रम यानिमित्ताने राबवण्यात येणार आहे. नि:शुल्क असलेल्या या महोत्सवाचा लातूरकर रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन अभिजात फिल्म सोसायटीचे जितेंद्र पाटील, प्रा. डॉ. विश्वास शेंबेकर, डॉ. स्वप्नील देशमुख आणि धनंजय कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

