23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeमहाराष्ट्रलातुरात भक्तीचा महामेळा

लातुरात भक्तीचा महामेळा

संतांचे पादुका पूजन, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, पालखीसह शोभायात्रा
भक्तांच्या गर्दीने दुमदुमली लातूरनगरी
लातूर : प्रतिनिधी
श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या सांगतेनिमित्त तसेच श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या सांगतेनिमित्त आणि कैवल्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या सांगतेनिमित्त लातूर शहरात दि. २१ फेबु्रवारी रोजी संतांच्या पादुकांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्या निमित्त निघालेल्या पादुका, दिंडी मिरवणुकीत रामकृष्ण हरी, संतांच्या जयघोषाने लातूरनगरी दुमदुमली. या निमित्ताने दि. २२ फेब्रुवारी ते २ मार्च यादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. त्यामुळे खंडापूरनजीकच्या नवीन कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भक्तांचा महापूर लोटला असून, परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

हेलिकॉप्टरने शनिवारी संतांच्या पादुका लातूर येथे आणण्यात आल्या. या पादुकांच्या पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली. श्री सिद्धेश्वर मंदिरापासून ६० फूट रोड, साळे गल्ली, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, जुने गूळ मार्केट, महात्मा गांधी चौक, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौक, बार्शी रोड, वसवाडी, जुने रेल्वे लाईनमार्गे श्री संत तुकाराम विद्यालय एमआयडीसी, शासकीय वसतिगृह, खंडापूर रस्ता व नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगण या मार्गे संतांच्या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लातूरच्या नागरिकांनी पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी हाती पताका आणि मुखी रामकृष्ण हरी, संतांच्या जयघोषाने लातूरनगरी दुमदुमून गेली होती.

खंडापूर गावाच्या जवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात विकासरत्न विलासराव देशमुख मांंजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याजवळील ४०० एकरच्या खूप मोठ्या मैदानात हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होत आहे. श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत नामदेवराय, श्री संत तुकोबाराय या तिन्ही संतांच्या पादुका शनिवारी हेलिकॉप्टरने लातूरला आल्या. त्यानंतर लातूर शहरातून शोभायात्रा निघाली. त्यामुळे संपूर्ण लातूर नगरी भक्तांच्या गर्दीने फुलून निघाली होती. यावेळी विठूनाम आणि संतांच्या जयघोषाने लातूर नगरी दुमदुमून गेली होती. लातूरकरांनी रस्त्याच्या कडेला दुतर्फा उभे राहून संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

पालखीची मिरवणूक
अत्यंत लक्षवेधी
सिद्धेश्वर मंदिरावर सकाळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी झाल्यानंतर या मंदिरापासून हजारो भक्तांच्या उपस्थितीत संतांच्या पादुकांचा पालखी सोहळा १२ कि.मी. अंतरावरील खंडापूर हद्दीतील नवीन कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जाण्यासाठी मार्गस्थ झाला. लातूर शहरातून पालखीसह शोभायात्रा निघाल्याने भक्तांच्या अलोट गर्दीसह लातूरकरांनी रस्त्यालगत गर्दी केल्याने रस्ते भक्तिरसात न्हाऊन निघाले.

१० हजार वारक-यांसह
भक्तांचा मोठा सहभाग
३७५ पताका, ३७५ तुळशी, ३७५ कळस, ३७५ विणेकरी, ३७५ मृदंग वादक, ३७५ चोपदार, १० हजार वारकरी, कीर्तनकार फेटे बांधून, टाळ घेऊन पादुका मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच ३७५ तुकाराम नावाचे व्यक्ती, ७५ नामदेव नावाचे व्यक्ती आणि ७५० ज्ञानेश्वर नावाचे व्यक्तींनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला.

७५० वर्षांनी योग
तब्बल साडेसातशे वर्षांनी लातूर शहरात संतांच्या पादुका दर्शनाचा योग आला. त्यामुळे संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लातूरकरांनी या पालखी मार्गावर मोठी गर्दी केली होती. हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा सोहळा असल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर आमच्यासाठी ही दिवाळी आहे, असेही भाविक भक्त यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR