20.3 C
Latur
Sunday, November 3, 2024
Homeलातूरलातुरात महाविकास आघाडीचे विराट शक्तीप्रदर्शन 

लातुरात महाविकास आघाडीचे विराट शक्तीप्रदर्शन 

लातूर : प्रतिनिधी 
काँग्रेस महाविकास आघाडीने लातूर शहरात दि. २९ ऑक्टोबर रोजी विराट शक्तीप्रदर्शन करीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ऐतिहासीक स्थळी झालेल्या विराट सभेत भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी  आपल्या हजारो सहकार्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने भाजपामध्ये मोठा भूकंप झाला आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरील असून जिल्ह्यातील भाजपा महायुतीच्या सहा जागा टेन्शनमध्ये आल्या
आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर गंजगोलाईतील जय जगदंबा मातेची महापुजा झाल्यानंतर विराट रॅली निघाली. सजवलेल्या रथामध्ये माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख, सौ. आदिती देशमुख, सौ. दीपशिखा देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी होते. प्रचंड उत्साहात वाजत गाजत ही विराट रॅली निघाली. रॅलीत तरुणांची लक्षणिय संख्या होती. त्यासोबत ज्येष्ठ महिला, पुरुष, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळ, मृदंग, भजनी मंडळी, वासुदेव, धनगरी ढोल पथके, बॅण्ड पथकांची रेलचेल होती. ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, ‘अमित देशमुख तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘धिरज देशमुख तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘दिलीपराव देशमुखसाहेबांचा विजय असो’, अशा घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता. रॅलीत सहभागींना जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रॅली मार्गावर ठिकठिकाणी फुलांची उधळण करुन रॅलीचे स्वागत  करण्यात आले. मेन रोड मार्गे हनुमान चौक, महात्मा गांधी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर  पोचली. तेथे या विराट रॅलीचे विराट सभेत रुपांतर झाले.
सभास्थळ हाऊसफुल्ल झाले होते. मंडळपामध्ये जितके नागरिक होते त्यापेक्षाही अधिक नागरिक मंडपा बाहेर होते. या विराट रॅलीने व विराट सभेने वातावरण काँग्रेस महाविकास आघाडीमय झाले.  लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभाची विराट सभा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस खासदार इम्रान प्रतापगडी, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल चौधरी, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, टवेन्टिवन  अ‍ॅग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख, रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिक्षा देशमुख, उल्हास पवार, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सुळ, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापूरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, निलंगा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळूंके, श्रीपती काकडे, महाराष्ट्रप् प्रदेश काँग्रेसे सरचिटणीस मोईज शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनिल बसपूरे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई उदय गवारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, पदाधिकारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, अल्पसंख्याक  काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. फारुक शेख, अनुसूचित जाती काँग्रेस सेलचे प्रा. प्रविण कांबळे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. जाधव, जिल्हा बँकचे संचालक पृथ्वीराज सिरसाट यांच्यासह काँग्रेस महाविकास  आघाडीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुणाल चौधरी, अभय साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. स्मिता खानापूरे यांनी केले. प्रारंभी महापुरुषांच्या तसबिरींना पुष्प अर्पण करण्यात आले. शंखनाद करुन, मशाल प्रज्वलीत करुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.  सुत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी व प्रा. शिवाजी गायकवाड यांनी केले. या विराट सभेस जनसमुदाय उपस्थित होता.
महाराष्ट्रात भाजपा बियालासुद्धा ठेवू नका
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वृक्षवल्लीच्या फांद्या बहादर मतदारांनी छाटून टाकल्या. त्यांना ३३३ वरुन २४५ वर आणुन ठेवले. आता विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा बियालासुद्धा ठेऊ नका, अशी गर्जना अध्यक्षीय समारोप करताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभाच्या विराट सभेते केली. ते पुढे राज्यातील सरकार नेमके कोणाचे आहे, याचा गेल्या अडीच वर्षात मेळ लागला नाही. त्यामुळेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला. युवकांच्या हाताला काम नाही. रोजगार नाही. शेतमालाचे भाव घसरले. शेतकरी अडचणीत आहे. हे सर्वच चित्र बदलण्यासाठी मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन करुन काँगे्रेस महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर काळजीपूर्वक काम करावे. प्रत्येक बुथवर ३०० मतांचे मताधिक्क्य द्यावे, असे आवाहन केले.
दिल्लीच्या रिमोटवर महाराष्ट्र चालणार नाही
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार दिल्लीच्या रिमोटवर चालत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांची ही भूमी दिल्लीच्या रिमोटवर चालणार नाही, असा रोखठोक इशारा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी यावेळी बोलताना दिला. ते पुढे म्हणाले, राजकारणात राहून जनसेवा कशी करता येते याचे एकमेव उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख साहेब होत. केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी जनसामान्यांची पिळवणूक करणारे आहेत. दिल्लीत आपला अधिकारा मागणाने सातशे शेतकरी शहीद झाले परंतू, या सरकारला त्याचे काहींच वाटले नाही. सरकार हे शेतक-यांचे, युवक, युवतींचे, ज्येष्ठ नागरिकांचे नाही. हे सरकार भ्रष्टाचा-यांचे आहे. २ कोटी नोक-यांचे काय झाले, हा प्रश्न मतदारांनी सत्ताधा-यांना विचारावा, असे नमुद करुन मतविभाजनाचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून होणार आहे. मतदारांनी दक्ष राहून मतविभाजनाचा त्यांचा प्रयत्न हाणुन पाडावा, असे आवाहन केले.
दलित बांधवाचा छळ करण्याचे पाप भाजपाने केले : अमित देशमुख
माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचा पराभव कसा झाला, हे सांगताना त्यांनी भाजपाच्या नेत्यांचा पर्दाफाश केला. तो धागा पकडून यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, भाजपाच्या नेत्यांनी माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा कसा छळ केला हे त्यांनी स्वत: सांगीतले. एका दलित बांधवाचा छळ करण्याचे पाप भाजपाने केले आहे. त्यांना मते मागण्याचा आता अधिकार नाही. प्रामाणिक भाव घेऊन सुधाकर शृंगारे काँग्रेस पक्षात आले. त्यांचा पुर्ण सन्मान केला जाईल, त्यांचे राजकीय पुनर्वसनही होईल.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूरला घडविण्याचे काम विकासरत्न विलासराव देशमुख, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील यांनी व काँग्रेस पक्षाने केले. लातूरला जिल्ह्याची घोषणा माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी केली. लातूर जिल्ह्यात दळणवणाची साधणे, सिंचनाच्या सुविधा, वैद्यकीय सेवां, शिक्षण, पाणी, औद्योगिकरण, रेल्वे, विमानतळासह जिल्ह्याचा चौफेर विकास केला. तरीही सत्ताधारी म्हणतात काँग्रेसने काय केले. काँग्रेसने काय केले हे जनतेला माहित आहे. तुम्ही काय दिवे लावले ते सांगा. भाई, भाऊ, दादांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले. इथल्या युवकांच्या हातचे काम काढून घेत युवकांना बेरोजगार केले. भ्रष्टाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्र पोखरुन निघाला आहे. महाराष्ट्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मतदारांनी आता पुढे येऊन महाविकास आघाडीला शक्ती द्यावी.  महाविकास आघाडीचे सारथ्य माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी स्विकारलेले असल्यामुळे महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होणार, असा आत्मविश्वास व्यक्त करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले,
‘ज्यांचा मास्टर माईंड श्रीकृष्ण आहे,
त्यांच्या नादाला लागु नये
शंभरातला एकही वाचला नाही
आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही.’
त्यामुळे प्रत्येकाने मी अमित देशमुख आहे,
असे समजून कामाला लागावे, असे आवाहन करुन
‘कैसे हट जाए धुपसे हम,
सायेमें हमारे कई लोग खडे है’
या शायरीने आपल्या भाषणाचा समारोप केला.
  महायुती सरकारने महाराष्ट्राचा विकास रोखला
स्वत:ची टिमकी वाजवून घेण्यासाठी भाजपा महायुती सरकारने जनसामान्यांचे २०० कोटी रुपये जाहिरांतीवर खर्च केले. महाराष्टाचा विकास रोखण्याचे पाप महायुती सरकारने केले, असा घणाघातील आरोप करुन आमदार धिरज देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चालणारा महाराष्ट्र महायुती सरकारने भकास केला. विष कालविण्याचे राजकारण सत्ताधारी करीत आहेत. आता लढायचय शेतक-यांच्या भल्यासाठी, युवकांच्या भविष्यासाठी, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी. त्यामुळे सत्ताधा-यांच्या आश्वासनाला बळी न पडता काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन केले.
जनसामान्यांचे हित काँग्रेस महाविकास आघाडीतच
राज्यातील महायुती सरकारच्या सर्वच योजना या फसव्या आहेत. लाडकी बहिण योजनेतून दीड हजार रुपये देऊन प्रचंड महागाईच्या रुपाने जनसामान्यांची लुट केली जात आहे. या उलट काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने जनसामान्यांचे हित जोपासण्याचे काम केले आणि करीतही आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा चौफे र विकास झाला. लातूरमध्ये मांजरा परिवार साखर कारखानदारीच्या माध्यमातून आणि जिल्हा बँकेच्या सहकार्याने शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR