Homeलातूरलातुरात सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

लातुरात सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

लातूर : प्रतिनिधी
व्हीएस पँथर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्यच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून लातुरात येत्या दि. १० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या सातव्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयाची जय्यत तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्हीएस पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने प्रेरित होऊन मागच्या सलग सात वर्षांपासून अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत २०० ते २२५ सर्वधर्मीय सामूहिक विवाह करून देण्यात आले आहेत. यावर्षीच्या विवाह सोहळयात एकूण ३५ वधू-वरांचे  विवाह लावून दिले जाणार आहेत. यामध्ये मुस्लीम दोन, बौद्ध १८ तर हिंदू समाजातील १५ वधू-वरांचा समावेश आहे. वधू-वरांना  मणी मंगळसूत्र, विवाहाच्या चा पेहरावांसह संसारोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येणार असल्याचे विनोद खटके यांनी सांगितले. हा विवाह सोहळा लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या भव्य मैदानावर रविवारी  सायंकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या सोहळयासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, यांच्यासह माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर,  आ. अभिमन्यू  पवार,  माजी मंत्री आ. संजय बनसोडे,  माजी मंत्री तथा, आ. अमित देशमुख, आ. रमेशआप्पा कराड,  शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वधर्मीय विवाह सोहळयास हजारोंच्या संख्येने व-हाडी  मंडळी उपस्थित राहणार असून त्या सर्वांच्या सुरुची भोजनाची सोय  करण्यात आली आहे. या सोहळयासाठी येणा-या लोकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जुन्या रेल्वे लाईनलगतच्या विलासराव देशमुख रस्त्याच्या बाजूने करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे होणा-या या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयास लातूरकरांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही विनोद खटके यांनी केले आहे.  याप्रसंगी व्हीएस पँथर्सचे प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांच्यासह  आनंद जाधव, निलेश कांबळे, रवि कुरील, प्रितम  दंडे, किरण पायाळ  असद शेख, स्वप्नील कांबळे, यांसह  मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR