लातूर : प्रतिनिधी
सृष्टीच्या रक्षणासाठी पर्यावरणाची जपणूक गरजेची असून पर्यावरणासाठी आव्हान ठरणा-या प्लास्टिकच्या पिशव्यांना नाकारुन पर्यावरण स्नेही कापडी पिशव्या वापरणे ही काळाची गरज आहे. या कामी लातूर आयएमए सरसावली असून कापडी पिशव्या देणारी व्हेंडींग मशीन त्यांनी शहरात उपलब्ध करुन दिली आहे.
जागितक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर गंजगोलाईत या मशीनचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व मनपा आयुक्त मानसी मिना यांच्या हस्ते झाले. आयएम लातूरचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, सचिव डॉ. विश्रांत भारती, कोषाध्यक्ष डॉ. मन्सूर भोसगे, उपाध्यक्ष डॉ. मेघना गुगळे, वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. श्वेता काटकर (पवार), सचिव डॉ. आकांक्षा त्रिपाठी (अवस्थी), सहसचिव डॉ. अब्दुल हमीद चौधरी, डॉ. महादेव बनसुडे, डॉ. वेदांत अवस्थी, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. आनंद कलमे, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. ज्योती धनवे, डॉ. विमल डोळे, उपआयुक्त वसुधा फड, सन्मती मेस्त्री, लातूर महानगरपालिकेत कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. हा उपक्रम ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा दरडे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. प्लास्टिकमुक्त लातूर-हरित लातूर, स्वच्छ लातूर या संकल्पनेअंतर्गत आयएमएने लातूर शहरात तो सुरू केला आहे. गंजगोलाई परिसरात अनेक बाजारपेठा आहेत. इथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. बरेचजण प्लास्टिक पिशव्या वापरतात. त्याचे विघटन होत नसल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. ते टाळण्यासाठी व लातूर शहरातील वाढते प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
गंजगोलाईत कापडी पिशव्या सहज उपलब्ध व्हाव्यात हाही येथे मशीन लावण्या मागचा उद्देश असल्याचे आयएमएच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी बास्टेवाड, मनपा आयुक्त मानसी व अन्य मान्यवरांनी यांनी या उपक्रमाचे कौतूक करीत प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा, असे नागरीकांना आवाहन केले. आज कापडी पिशवीचा स्वीकार करा, उद्याचे पर्यावरण सुरक्षित करा हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
















