लातूर : प्रतिनिधी
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने यंदाही ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याची प्राथमिक फेरी दि. २४ ऑगस्ट रोजी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असल्याची माहिती लातूर नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
या स्पर्धेत लातूरमधून १२ संघ सहभागी होत असून यात शहरातील ११२ तरुण व अनुभवी कलाकार, तंत्रज्ञ सहभागी होत आहेत. ही स्पर्धा दर वर्षी होणार असून त्याचे प्राथमिक फेरीचे केंद्र लातूर असणार आहे. तर अंतिम फेरी मुंबई येथे होणार आहे. लातूर केंद्रावरून प्रथम येणारी एकांकिका अंतिम फेरीस पात्र ठरणार आहे. पात्र एकांकिकेतील कलाकारांना मुंबईत सादरीकरणसोबतच दिग्गज मान्यवरांच्या मार्गदर्शनात नाट्यप्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सहभागी प्रत्येक संघास प्रत्येकी २ हजार रुपये निर्मिती खर्च दिला जाणार आहे.
अंतिम फेरीत भरघोस बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत लातूरतील तालीम स्वरूपात होणा-या प्राथमिक फेरीत ड्रायव्हर (राजर्षी शाहू महाविद्यालय), दि फिअर फॅक्टर(फ्रिलान्सर), दि रिंग अगेन (सूर्योदय सांस्कृतिक कलामंच), अध्याय पाचवा (कलारंग सांस्कृतिक संस्था), गांधी कधी येणार (नाट्यनिकेतन), आंबेडकरीजम (लक्ष्मीनामा फाउंडेशन), यथार्थ (कलोपासक मंडळ ), येडी बाभळ (कॉक्सिट महाविद्यालय), जाहला सोहळा अनुपम (जयक्रांती अध्यापक महाविद्यालय), लेकरू (मानवता बहु. सेवा. संस्था), बट बिफोर लिव्ह (शाहू महाविद्यालय ), मैं वारी जावा (रसबहार कलामंच) आदी एकांकिका सादर होणार आहेत. या महोत्सवास लातूरकर रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, नाट्यस्वाद घ्यावा व कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन स्पर्धा केंद्रप्रमुख अॅड. शैलेश गोजमगुंडे, स्पर्धा समन्वयक डॉ. मुकुंद भिसे व प्रा. डॉ. दीपक वेदपाठक, प्रदीप पाटील खंडापूरकर, धनंजय बेंबडे, अनिल पुरी, यांनी केले आहे.

