लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल करणा-या नीतीशा संजय जगताप यांनी गुवाहाटी येथील गुन्हे अन्वेषण विभागात वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. अत्यंत कमी वयात भारतीय पोलीस सेवेत वरिष्ठ पदावर नियुक्ती मिळवत नीतीशा यांनी लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
नीतीशा यांच्या या उल्लेखनीय यशामागे आजी, आई-वडील तसेच मोठी बहीण तनिषा संजय जगताप यांचे मोलाचे योगदान आहे. केवळ मुलींच्या शिक्षणासाठी कुटुंबाने पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या त्यागातून आणि मुलींच्या मेहनतीतून आज या निर्णयाचे सार्थक झाले आहे. नीतीशा भारतीय पोलीस सेवेत वरिष्ठ अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असताना त्यांची मोठी बहीण तनिषा यांनी पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथे उच्च शिक्षण घेत त्यांनी जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनीत स्थान मिळविले. त्यामुळे एक बहीण जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात तर दुसरी भारतीय पोलीस सेवेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याने जगताप कुटुंबाची ही दुहेरी यशोगाथा विशेष कौतुकास्पद ठरली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे तनिषा आणि नीतीशा यांच्या प्रवासातून दिसून येते. नीतीशा जगताप यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल लातूर जिल्ह्यातील नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.















