लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला, त्यातून मला जनसेवा करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. दयानंद शिक्षण संस्थेने निर्माण केलेला गुणवत्तेचा ‘लातूर पॅटर्न’ आज देशभर प्रसिद्ध असून, आधुनिक काळातही ही संस्था विद्यार्थ्यांना ख-या अर्थाने सक्षम करत आहे. विशेषत: रात्र अभ्यासिका, मोफत चहा-पाणी यांसारख्या सोयी-सुविधा, युवक महोत्सवातील दैदिप्यमान यश आणि विविध स्पर्धांमधील उत्तम कामगिरी यावरून येथील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न आहेत हे सिद्ध होते. ऑनलाइन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मिळणारे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होत आहेत. गुणवत्तेला आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाला दिले जाणारे हे महत्त्व अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन लातूर शहराच्या नूतन महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने नूतन महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर स्रेहल उटगे यांचा विशेष सत्कार सोहळा दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. या सत्कार सोहळ्यास संस्थेचे सचिव रमेश बियाणी, उपाध्यक्ष ललितकुमारशाह, रमेशकुमार राठी, विशाल लाहोटी, अजिंक्य सोनवणे यांच्यासह सर्व नियामक मंडळातील सदस्य व महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमहापौर अॅड. उटगे म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्थेचा माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा असून, येथील पदाधिका-यांच्या कार्याचे संस्कार आपल्यावर झाले आहेत. आमदार अमित देशमुख यांनी दिलेल्या संधीचे सोने करून शहराच्या विकासाचा वारसा अधिक निष्ठेने पुढे नेण्याचा आपला ठाम संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बियाणी म्हणाले, महापौर व उपमहापौर हे दयानंद शिक्षण संस्थेच्या कुटुंबाचेच अविभाज्य घटक असल्याचे नमूद करून, शहराचा सांस्कृतिक वारसा जपणे तसेच लोकप्रशिक्षण व लोकशिक्षणावर संस्थेने दिलेला भर नूतन पदाधिका-यांच्या माध्यमातून अधिक प्रगल्भ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेने केवळ पदवीधर घडवले नाहीत, तर समाजाचे नेतृत्व करू शकतील असे सुजाण नागरिक निर्माण केले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका आणि दयानंद संस्था यांचे हे जिव्हाळ्याचे नाते भविष्यात अधिक दृढ होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात लाहोटी यांनी नूतन महापौर व उपमहापौरांचे कौतुक करत लातूरचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासोबतच रस्ते दुरुस्ती तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे तातडीने निराकरण करणे ही नूतन पदाधिका-यांची प्राथमिकता असावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सत्ता ही जनतेची सेवा करण्याचे साधन आहे, त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक कारभारावर भर द्यावा. दयानंद शिक्षण संस्थेची शिस्त आणि मूल्यांची शिदोरी तुमच्या भावी राजकीय प्रवासात मार्गदर्शक ठरेल, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलकुमार माळी यांनी केले, तर डॉ. मनीषा अष्टेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

