लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक नकाशावर आता महिला आणि स्थानिक लघुउद्योजकांनी आपली मोहोर उमटवायला सुरुवात केली आहे. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार’ या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक लघुउद्योग आता भरारी घेत आहेत. याच उद्योजकांच्या संघर्षाची आणि यशाची प्रचिती घेण्यासाठी ट्वेंन्टीवन अॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांनी लातूर शहरातील विविध प्रभागांतील लघुउद्योगांना भेटी देऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला.
व्हीडीएफ बाजार: आत्मनिर्भरतेचे हक्काचे व्यासपीठ
दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या व्हीडीएफ बाजार या उपक्रमाचे फलित आता दिसू लागले आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही स्टॉल फीस भांडे न आकारता महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे उद्योजिकांच्या खर्चात बचत होऊन त्यांना थेट नफा मिळाला आणि त्यांच्या उत्पादनांना मार्केटिंगसाठी मोठे व्यासपीठ मिळाले.
सौ. अदितीताई देशमुख यांनी लातूर शहरातील प्रभाग निहाय विविध उद्योजकांच्या कार्यस्थळी जाऊन उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि पॅकेजिंगची पाहणी केली. खाद्यपदार्थ आणि गृहउद्योग: मातोश्री पापड उद्योग (प्रभाग १८): धिरजकुमार भनगीरे यांच्या या उद्योगातील शिस्त आणि पारंपारिक चवीचे त्यांनी कौतुक केले. योगेश बडवे यांचा चिकी उद्योग (प्रभाग १७): स्वयंपाकघरातून सुरू झालेला हा प्रवास आता दर्जेदार ब्रँडकडे वाटचाल करत आहे. दुर्वा लोणचे व मसाले (प्रभाग १७): अश्विनी शिंदे यांची जिद्द आणि उत्पादनातील व्यावसायिकतेची त्यांनी वाखाणणी केली.
दिशा पापड (प्रभाग १७) व लिज्जत पापड केंद्र (प्रभाग २): प्रतिभा गायकवाड आणि शिलाताई वाघमारे यांच्या कष्टाने उभा राहिलेला हा व्यवसाय महिला सक्षमीकरणाचा आदर्श आहे. शबानाज किचन (प्रभाग ९) व आशा बगदाळकर यांचा फूड पॅकेजिंग उद्योग (प्रभाग १): घरगुती चवीला आधुनिक पॅकेजिंगची जोड देऊन या महिलांनी मोठी प्रगती केली आहे. फॅशन आणि टेलरिंग: रेखा रोकडे (फॅशन मटेरिअल), पूजा सुरज पत्की (साडी व ड्रेसेस), शामल साडी सेंटर (शामल पवार) आणि आशा मीरा देशमुख (अॅडव्हान्स टेलरिंग): या महिलांनी फॅशन क्षेत्रात स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उमंगच्या मुलांची जिद्द विशेष म्हणजे, सौ. अदितीताई देशमुख यांनी नवीन एमआयडीसी भागातील उमंग इन्स्टिट्यूट सेंटरला भेट दिली. या सेंटरमधील मुलांनी व्हीडीएफ बाजारमध्ये तयार केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. या मुलांच्या हाताला काम आणि कलेला सन्मान मिळावा, यासाठी आमचे कुटुंब सदैव पाठीशी असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
लातूरचे अर्थचक्र अधिक बळकट करू
या भेटींदरम्यान महिलांशी संवाद साधताना सौ. अदितीताई अमित देशमुख म्हणाल्या की, जेव्हा घराची चौकट ओलांडून एखादी महिला उद्योजिका बनते, तेव्हा ती फक्त स्वत:लाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि पर्यायाने शहराच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देते. व्हीडीएफ बाजारच्या माध्यमातून आम्ही दिलेली संधी आणि या भगिनींनी घेतलेली मेहनत याचे फलित आज या यशस्वी व्यवसायांच्या रूपात दिसत आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि स्वदेशीचा अभिमान बाळगणे ही आपली जबाबदारी आहे. यावेळी अनेक उद्योजिकांनी सण-उत्सवांच्या निमित्ताने व्हीडीएफ बाजार सारखे उपक्रम वारंवार राबवावेत, अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, आगामी काळात महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी संगिता मोळवने, प्रीतम जाधव, गजानन बोयणे उपस्थित होते.

