लातूर : प्रतिनिधी
अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट डिझायर आणि स्कॉर्पिओ या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच १२ सीवाय ७०२२ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर या कारमधून चार जण सायगाव येथे सुरू असलेल्या उरुसासाठी जात होते. भरधाव वेगात असलेल्या या कारवरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार थेट रस्त्याच्या दुभाजकावरून उसळून विरुद्ध दिशेने येणा-या एमएच २४ वाय ४७७१ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीवर जोरात आदळली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट डिझायरमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, स्कॉर्पिओमधील दोन महिलांसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
गंभीर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उरुसाला जाणा-या प्रवाशांवर काळाने घाला घातल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील मृतांची नावे आणि कोणत्या गावचे रहिवासी आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस घटनेचा पंचनामा करत असून पुढील तपास सुरू आहे.

