लातूर : प्रतिनिधी
येत्या दि. १३ डिसेंबरपासून पंढरपूर- तिरुपती व्हाया लातूर साप्ताहिक रेल्वेसेवा सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी दिली.
पंढरपूरमार्गे तिरुपती रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागच्या अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची मागणी होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी दि. १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या महत्वपूर्ण बैठकीत ही मागणी आग्रहाने लावून धरली होती. त्यांनी ही रेल्वेसेवा लातूरमार्गे पंढरपूर-तिरुपती सुरु करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न केले. त्यांच्या मागणीनुसार दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०७०१२ व ०७०१३ ही तिरुपती पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वे सेवा लातूरमार्गे सुरु करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. येत्या दि. १३ डिसेंबरपासून ही गाडी सुरु होणार आहे. गाडी क्रमांक ०७०१२ ही दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी तिरुपतीहून सुटेल. ही गाडी काचीगुडा, सिकंदराबाद, बिदरमार्गे दुस-या दिवशी म्हणजे दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी लातूर स्थानकावर पोहचेल. ही गाडी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर स्थानकावर पोहचेल.
गाडी क्रमांक ०७०१३ ही दर रविवारी पंढरपूरहून रात्री ८ वाजता निघेल. ही गाडी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी लातूर रेल्वे स्थानकावर पोहचेल तर दुस-या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री १०.३० वाजता तिरुपती स्थानकावर पोहचेल. या गाडीला एक एसी प्रथमवर्ग, एक एसी फर्स्ट कम टू टिअर, दोन एसी टू टिअर, ६ एसी थ्री टिअर, ९ स्लीपर क्लास, दोन द्वितीय श्रेणी कम दिव्यांग एसएलआर असे एकूण २३ डबे असणार आहेत. ही सुविधा तूर्तास दि. १३ डिसेंबर ते दि. २८ डिसेंबर या कालावधीत सुरु असणार आहे. प्रवाशांच्या मिळणा-या प्रतिसादावर या गाडीची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार असल्याचे संजय निलेगावकर यांनी सांगितले. याशिवाय या बैठकीत हरंगुळ रेल्वे स्थानकाची प्लॅटफॉर्मची उंची आणि लांबी वाढविणे, लातूर-पुणे-खडकी इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करणे आदी विषयांवरही महत्वपूर्ण चर्च झाल्याची माहिती निलेगांवकर यांनी दिली.

