लातूर : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून सुरू असलेल्या कारवाईचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या लातूर शाखेने स्वागत केले असून या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची अत्यंत निष्पक्षपणे आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेने शासनास केली आहे. या प्रकरणात ज्या डॉक्टरांचा सहभाग असल्याचा संशय आहे किंवा ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांना आयएमए कोणत्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणासारख्या अशा कोणत्याही बेकायदेशीर व अनैतिक कृत्याचा संघटना निषेध करीत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासार्हतेशी खेळणा-या दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी सीबीआयने कोणत्याही दबावाशिवाय या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षांची विश्वासार्हता टिकून राहणे देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचे आहे. पात्र आणि कष्टकरी विद्यार्थ्यांवर अन्याय करणा-या कोणत्याही व्यक्तीचे समर्थन आयएमए कधीही करणार नाही असे लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत ,सचिव डॉ. विश्रांत भारती, वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. श्वेता काटकर पवार, सचिव डॉ. आकांक्षा त्रिपाठी अवस्थी यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेने राज्य स्तरावर हा निर्णय घेतला असून लातूर शाखेनेही या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे डॉ. राऊत व डॉ. भारती यांनी सांगितले.
















