किल्लारी : महेश उस्तुरे
येथील लातूर-उमरगा रोडवर भर गर्दीच्या रस्त्यावर उभा असलेला एक स्ट्रीट लाईटचा पोल आज्ञात वाहनाने धक्का दिल्यामुळे कलला आहे. त्याच्या बाजूलाच उंच विद्युत/हायमास्ट पोल गेल्या काही महिन्यापासून धोकादायकरित्या एका बाजूला झुकलेला असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता असताना अशा अवस्थेतील पोलमुळे वाहनचालक, विद्यार्थी, पादचारी आणि परिसरातील व्यावसायिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा गजबजलेल्या चौकात झुकलेल्या पोलकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा धोकादायक परिस्थितीत तत्काळ तांत्रिक पाहणी करून खांब सुरक्षित करणे किंवा आवश्यक असल्यास तो बदलणे गरजेचे आहे. सÞबधीतानी याकडे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अशा धोकादायक बाबींकडे गांभीर्याने पाहणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळ्यात अशा झुकलेल्या पोलमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, आशी मागणी होत आहे.
















