लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २३ जागांसह सर्वाधिक यश मिळवून हे सिद्ध केले आहे की, हा जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि आजही तो अभेद्य आहे. लातूरच्या जनतेने जो भरघोस पाठिंबा आणि आशीर्वाद दिला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी अहोरात्र प्रयत्नशील राहातील, अशा शब्दांत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मंगळवारी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील काँग्रेस आघाडीच्या विजयाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांची भेट घेऊन शुभेच्छा स्विकारल्या. निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी नवनियुक्त सदस्यांशी संवाद साधला जळकोट, औसा, निलंगा, लातूर आणि उदगीर तालुक्यांसह जिल्ह्यातील काँग्रेस आघाडीचे विजयी उमेदवारांनी आमदार अमित देशमुख यांची भेट घेतली यावेळी सर्वांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करुन मतदारांचे विशेष आभार मानले.

