लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त लातूर काँग्रेसच्या वारकरी विभागाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शरद देशमुख महाराज यांनी प्रबोधनाचे ७५ कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता. याच संकल्पातून १ ऑगस्टपासून वारकरी विभागातर्फे लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ह. भ. प. शरद देशमुख महाराज यांनी १३ दिवसांच्या ज्ञानोबा-तुकोबा समता वारकरी दिंडीचे आयोजन केले आहे.
ही दिंडी लातूर ग्रामीण मतदारसंघातील ५१ गावांतून जाणार असून या दिंडीचे १२ ठिकाणी मुक्काम असणार आहेत. या दिंडीची सुरुवात १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मळवटी या गावातून होणार असून याचा समारोप १३ ऑगस्ट रोजी बाभळगाव येथे होणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून १३ दिवस कीर्तन, प्रवचन, भजन हरिनामाचा गजर तसेच संवाद बैठका होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या वारकरी विभागाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शरद देशमुख महाराज यांनी दिली आहे.

