- Advertisement -
५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
लातूर : प्रतिनिधी
लातूरकरांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न मूर्त स्वरूपात येत असून काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज १०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले तरी या ठिकाणी ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी येथे दिली.
लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषी महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते. यावेळी विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, महापौर जयश्रीताई सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगीता पतंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर लातूरला येण्यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाचा विषय माझ्यापर्यंत आला होता. यासाठी येथील लोकप्रतिनिधी व माझं लातूर परिवाराने सातत्यपूर्ण आग्रही मागणी मांडली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलली. सर्वांच्या प्रयत्नातून रूग्णालयाच्या जागेचा विषय मार्गी लागला. आता रुग्णालय इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असून इमारतीचे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होईल, याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये. इमारतीचे काम विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सातत्याने आढावा घेण्यात येईल. या रुग्णालयाच्या माध्यमातून लातूरकरांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्री भोसले यावेळी म्हणाले.
लातूर ते कल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे लातूर ते कल्याण हे अंतर पाच तासात गाठता येईल, हा महामार्ग लातूर जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच लातूर येथे जुन्या सर्किट हाऊसच्या जागेवर नवे सुसज्ज सर्किट हाऊसची उभारणी केली जाईल, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी केले. त्यानंतर प्रस्तावित रुग्णालय इमारतीच्या आराखड्याची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. प्रारंभी पालकमंत्री भोसले, सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण करून जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
चांगल्या आरोग्य सुविधा
मिळतील : सहकारमंत्री
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे रुग्णालयाच्या जागेसाठी निधी उपलब्ध झाला. महामार्गाच्या लगतची जागा जिल्हा रुग्णालयाला मिळाली असून या ठिकाणी मिळणा-या आरोग्य सुविधा दर्जेदार असाव्यात. ही इमारत आरोग्य मंदिर असून इमारतीचे बांधकाम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने कोविडच्या कठीण काळात समाजाची चांगली सेवा केली, त्याचप्रमाणे यापुढेही रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले.
- Advertisement -
















