लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी पाचशेहून अधिक भाविक निघाले आहेत. त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात भाविकांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच हज यात्रेत प्रार्थनेवर भर द्यावा, तेथील स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, अशा सूचना हज कमिटी ऑफ महाराष्ट्रच्या प्रशासकीय अधिकारी के. एफ. नाईकवाडे यांनी रविवारी दिल्या.
येथील एम. के. फंक्शन हॉलच्या सभागृहात सुफा एज्युकेशन अॅन्ड वेल्फेअर सोसायाटी अंतर्गत रहेनुमा-ए-हज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हज कमिटीच्या मार्गदर्शनात तिसरे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षणात हज यात्रेकरूंना मास्टर ट्रेनर हाफीज खुदबोद्दीन, हजरत मौलाना मुफ्ती हसनैन रमहानी मालेगाव, लातूर येथील मौलाना इसराईल रशिदी यांनी हज यात्रेची पध्दती, तेथील सुविधा आदींबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा हज प्रशिक्षक अमिरपाशा मणियार, अॅड. ईस्माईल शेख यांनीही यात्रेकरूंना माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुफा एज्युकेशन अॅन्ड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष महमंद कामिल मणियार, सादीक आत्तार, इमरान शेख, सलीम मणियार, अॅड. रब्बानी बागवान, असद सय्यद, मौलाना शौकत अली, सरफराज मणियार, परवेज पठाण, एजाज तांबोळी, डॉ. रईसखान पठाण, शरीफखान पठाण, अहद तांबोळी आदींनी परिश्रम घेतले. प्रारंभी राज्य हज कमिटीच्या प्रशासकीय अधिकारी नाईकवाडे यांनी दृकश्राव्य माध्यमातून यात्रेकरूंशी संवाद साधला. मौलाना मोईज यांनी उमराह यात्रेची माहिती दिली.
प्रशिक्षण शिबिरात हज यात्रेकरूंना त्यांच्या आरोग्य तपासणीचे कार्ड वाटप करण्यात आले. प्रवासात घ्यावयाची काळजी, तेथील प्रार्थना स्थळे, कोणत्या वेळी कोणती प्रार्थना, सर्व धार्मिक विधी वेळेत आणि नियोजनानुसार करावेत, पुरूषांनी इहराम योग्य पध्दतीने परिधान करावेत, आरामदायक पादत्राने वापरावीत, असा सल्ला तज्ञांनी दिला.
आवश्यक तेवढीच रक्कम सोबत बाळगावी, नियमांचे पालन करावे, ओळख पटेल असे कार्ड , बॅज घालावेत, असे सांगण्यात आले. लातूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी कमिटीकडून ४७५ तर खाजगी कंपनीकडून जवळपास ७० असे एकुण साडेपाचशे भाविक हज यात्रेसाठी जाणार आहेत. प्रशिक्षणास बहुतांश उपस्थित होते. यावेळी यात्रेकरूंना सौदी चलन बदलून देण्यात आले.

