विजांचा कडकडाट, शेतकरी चिंताग्रस्त
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच असून, बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसादरम्यान लातूर शहरात ब-याच भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन काढणीला वेग आला आहे. मात्र, पावसाचा धडाका सुरू असल्याने सोयाबीन काढणीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे.
जिल्ह्यात सध्या सोयाबीनच्या काढणीला वेग आला आहे. मागच्या दोन दिवसांत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतक-यांनी जोमाने सोयाबीन काढणी सुरू केली होती. मात्र, रोज कुठे ना कुठे पाऊस कोसळत असल्याने काढणीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. त्यातच बुधवारी रात्री आकाशात ढग दाटून आले आणि ९.४५ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरूच होता. त्यामुळे सोयाबीन काढणीला फटका बसू शकतो. अगोदरच सोयाबीनचे पीक पाण्यात आहे. त्यात वरून पाऊस कोसळत असल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.
वीज पुरवठा खंडित
विजांच्या कडकडाटासह लातूर शहर परिसरात पाऊस सुरू होताच शहरातील ब-याच भागातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातही ब-याच भागात रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.