लातूर : प्रतिनिधी
दसरा-दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत लातूर-हडपसर(पुणे) मार्गावर विशेष रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. ही रेल्वे २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे.
आगामी दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्याासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने विविध मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत लातूर ते पुणेदरम्यान विशेष रेल्वे धावणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऐन दिवाळीत ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. ही सेवा सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या चार दिवशी उपलब्ध असणार असून या मार्गावरील हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डु्वाडी, जेऊर, दौंड हे सहा थांबे देण्यात आले आहेत.
०१४२९ या क्रमांकाची ही विशेष रेल्वे २६ सप्टेंंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत लातूरहून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० हडपसर येथे पोचेल. तर ०१४२९ ही विशेष गाडी हडपसर येथून दुपारी ४.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.२० वाजता लातूर येथे पोचेल. दोन्ही विशेष गाड्यांच्या प्रत्येकी ३७ फे-या होतील, असे रेल्वे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
















