लातूर : प्रतिनिधी
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागात विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिक आणि शेतक-यांना वेळीच मार्गदर्शन मिळावे, तसेच गावांमध्ये उद्भवू शकणा-या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाकडून ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २११ गावांना भेटी देऊन ११ हजार ७४२ नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून आगामी काळात उद्भवू शकणा-या अडचणींचा आढावा घेणे, संभाव्य धोके ओळखणे आणि त्यावर सामूहिकरीत्या उपाययोजना निश्चित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेती उत्पादनात घट होऊन शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न घटण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पशुधन चोरी, शेतीतील अवजारे व साहित्य चोरी जाणे, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणी यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संभाव्य समस्यांचा वेळीच विचार करून त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार गावोगावी भेटी देत आहेत. या भेटींदरम्यान शेतक-यांनी आपल्या पशुधनाची, शेतीच्या साहित्याची आणि इतर मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता कशी राखावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास काय करावे, तसेच गावातील नागरिकांनी एकमेकांच्या सहकार्याने सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
……………..४……………….
















