लातूर : प्रतिनिधी
सध्याच्या काळात भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या पद्धतीची वक्तव्ये करीत आहेत, त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याचे सल्ले मला दिले जात आहेत. परंतु, अशा शिवराळ संस्कारात मी वाढलेलो नाही आणि ही लातूरची संस्कृतीही नाही, असे सांगून लातूरची सुसंस्कृत परंपरा कायम राखण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहरातील विविध समाज घटकांच्या प्रतिनिधीसोबत येथील साळाई मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या व्यापक बैठकीत आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे, अॅड. किरण जाधव, अॅड. उदय गवारे, दीपक सुळ, सुकेशनी मुस्कावाड, प्रा. सुधीर अनवले, भारत काळे, रंगनाथ घोडके, संभाजी सूळ, डॉ. संजय मोरे, बाळासाहेब देशपांडे, सुरेश राठोड, लक्ष्मण दावणकर, राजकुमार झिपरे, सुरेश लहाने, प्रभाकर केंद्रे, प्रदीप राठोड, केतन हलवाई, भाऊसाहेब शेंद्रे, प्रकाश मिरगे, रामकिसन मदने, हरिश्चंद्र पांचाळ, संजय बेल्लाळे, अजित निंबाळकर, भगवान माकणे, रितेश भीसेण, भास्कर तामटे, उषा आडे सुरेश चव्हाण, रामकृष्ण मदने, विजयकुमार साबदे, व्यंकटेश पुरी, प्राचार्य एकनाथ पाटील, प्राचार्य पी. एन. सगर, भाऊसाहेब शेंद्रे, सुनील पडिले, रामदास चव्हाण, विजय देशमुख, बालाजी मुस्कावाड, ठोंबरे बाळकृष्ण, धायगुडे, अनुप शेळके, प्रदीप राठोड, योगेश स्वामी, सुभाष घोडके, विष्णुदास धायगुडे आदिसह लातुर शहरातील कुंभार, गोसावी, कासार, वासुदेव, सुतार, लोहार, वडार, गवंडी आदी विविध समाज प्रतिनिधीं उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, लातूर शहराचा आत्मा सर्वधर्म समभावाचा आहे. यामुळे येथे शांतता आणि विकासाला गती मिळत आहे. यासाठी या ठिकाणचे सामाजिक एकोप्याचे अनुकुल असलेले वातावरण कायम राखू, विकासाची येथील गती कायम राखण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत येथील सुजाण नागरिकांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस आशीर्वाद देऊन विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
लातूरातील प्रत्येक समाज घटक सकारात्मक आहे, त्यामुळेच मागच्या ५० वर्षापासून येथे लोकप्रतिनिधी म्हणून योग्य व्यक्तीची निवड होत राहिली आहे. आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि अलीकडच्या काळात मी स्वत: लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही, ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, लातूर महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच, लातूरच्या भविष्यातील वाटचालीसाठी नेमके काय करायला हवे यासंदर्भात विविध समाज घटकांच्या बैठका घेऊन त्यांच्या सूचना आणि मागण्या नोंदवून घेतले आहेत. या सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट व्हावी यासाठी आज मराठा, मुस्लिम, माळी, परीट, न्हावी, वडार, सुतार, गोसावी, कासार, कुंभार, गवंडी, वासुदेव, लोहार, बंजारा, गवळी, धनगर, भावसार, महादेव कोळी, यलम, रजपूत, ब्राह्मण, टकारी, जोशी, तेली, शिंपी, गुरव, वंजारी, भोई, सोनार, आदी समाजाच्या प्रतिनिधी सोबत आजची व्यापक बैठक घेत आहोत. इतर समाज प्रतिनीधींच्याही टप्याटप्याने बैठका होणार आहेत. या सर्व समाज घटकांनी ज्या काही मागण्या आणि सूचना केल्या आहेत, सर्वांची नोंद आम्ही घेतल्या असून महापालिका निवडणूक जाहीरनामामध्ये त्यापैकी काही ठळक सूचना नोंदवण्यात आले आहेत, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता महापालिकेत आल्यास या सर्व सूचनांची अंमलबजावणी केली जाईल अशा आश्वासन यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी बोलतांना दिले. लातूरकरांनी आजवर नेहमीच आम्हाला साथ दिली आहे, ती साथ पुढेही कायम राहणार याचा मला विश्वास आहे, असे सांगून काही सहकारी निवडणूक काळात आम्हाला सोडून गेले असले तरी मी त्यांना सोडलेले नव्हते, हे आवर्जून आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सध्या राज्यातील राजकारणाचा स्तर खालावत असल्याचे नमूद करून आणि निवडणूक काळात उमेदवार पळवणे, त्यांना पैशाचे अमित दाखवणे, त्यांना मारहाण करणे, असे प्रकार सत्ताधारी मंडळीकडून केले जात आहेत, गंभीर बाब आहे, खरे तर सत्ताधारी भाजपचे मंडळी एवढ्यावरही थांबत नाहीत, त्यांना फक्त काँग्रेसचा पर्याय करायचा नाही तर काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावाच्या विचाराचा खून करावयाचा आहे, त्यांची ही मनोवृत्ती राज्याला आणि देशाला विघातक असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे. सध्याच्या काळात भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या पद्धतीची वक्तव्य करीत आहेत, त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जावे असे काही सहकारी सुचवत आहेत परंतु, या संस्कारात मी वाढलेलो नाही आणि लातूरची ही ती संस्कृती नसल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले.
लातूरची संस्कृती जपून ठेवण्यासाठी, विकासाला गती देण्यासाठी महापालिका निवडणुकीतील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन करून, हे सर्व उमेदवार समाजाभिमुख, आणि कर्तव्य तत्पर आहेत, शहराचा त्यांच्याकडून विकास करून घेण्याची हमी मी घेत आहे, असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

