जळकोट : ओमकार सोनटक्के
एकीचे बळ आणि मिळते फळ ही म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. अशीच एकी मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण अशा रेल्वे मार्गासाठी लातूर व नांदेड जिल्ह्यातील खासदारांनी लोकसभेमत दाखवली आहे. मराठवाड्यातील या तीन खासदारांनी गत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड-जळकोट- मुखेड- बोधन रेल्वेमार्गाचा प्रश्न लोकसभेत वारंवार उपस्थित केला आहे तसेच प्रत्यक्षपणे रेल्वे मंत्र्यांचीही भेट घेतली आहे. यामुळे या खासदारांच्या विकासात्मक दृष्टिकोनाची लातूर तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
मराठवाड्यातील अनेक सुपुत्रांनी यापूर्वी मराठवाड्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले . लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूर रोड ते कुरूडवाडी हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग झाला. यामुळे नांदेड ते मुंबई तसेच उदगीर ते मुंबई व बिदर ते मुंबई अंतर कमी झाले. या व्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्यामुळे मराठवाड्यात जलसिंचन मोठ्या प्रमाणात झाले. आता मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असलेला म्हणजे लातूर रोड ते बोधन हा रेल्वे मार्ग होय. हा रेल्वे मार्ग झाल्यास दक्षिणेकडील राज्य अतिशय टप्प्यात येणार आहेत. यासोबतच मुंबई ते विशाखापट्टणम हे अंतरही खूप कमी होणार आहे. यासोबतच दक्षिणेकडील राज्यांना मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण देवस्थानेही पाहता येणार आहेत. हा रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी गत अनेक वर्षापासून होत आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सन २०१६ मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती. या रेल्वे मार्गाचे फायनल लोकेशन सर्वेही पूर्ण झालेला आहे. आता फक्त बजेटची आवश्यकता आहे परंतु केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या रेल्वे मार्गासाठी नागरिक हे आग्रही आहेत कारण या रेल्वेमार्गामुळे अविकसित तालुक्यांचा विकास होणार आहे. मुखेड तसेच जळकोट बिलोली या तालुक्याचा विकास होणार आहे . आता या रेल्वेमार्गाची जबाबदारी मराठवाड्यातील नांदेड व लातूर जिल्ह्यातील खासदारांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी लोकसभेमध्ये या रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित केला या सोबतच रेल्वेमंत्र्यांची तीन वेळा भेट घेऊन निवेदनही सादर केले . यासोबतच नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही प्रश्न उत्तराच्या तासांमध्ये लोकसभेत लातूर रोड-जळकोट-मुखेड -बोधन या रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित केला. जवळपास दोन मिनिटे याच रेल्वे मार्ग विषयी लोकसभेत चर्चा केली. या सोबतच नांदेड येथील राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनीही राज्यसभेत हा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. हा रेल्वे मार्ग कसा महत्त्वपूर्ण आहे हे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले .
पहिल्यांदाच तीन खासदार एकत्र येत एका महत्वपूर्ण अशा विकासात्मक रेल्वे मार्गाच्या प्रश्नाविषयी संसदेत आवाज उठवल्याची घटना अनेक वर्षानंतर घडली आहे . यामुळे आता या खासदारांच्या एकीचा फायदा या रेल्वे मार्गाला होणार, अशी अपेक्षा आता जनतेला आहे. खासदारांच्या या विकासात्मक दृष्टिकोनाचे जळकोट- मुखेड -बिलोली-नायगाव-या तालुक्यातील जनतेने कौतुक केले आहे.

