लातूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील आशिव येथील महानगर गॅस येथून रविवारी सकाळी लातूर शहरा नजीकच्या महाराना प्रतापनगर गावा जवळच्या पार्थ पंपावर जवळपास १ हजार २०० किलो सीएनजी घेऊन जाणा-या टँकर मधून गरूड चौका शेजारील येशोदीप हॉटेल समोर प्रशेरने सीएनजी लिकेज झाल्यामुळे जवळपास अडीच तास नांदेड रोड वाहतूक ठप्प झाली होती तर लातूरकरांचा जीव ही टांगणीला लागला होता. परंतु पोलीस व अग्निशमन दलाच्या व नागरीकांनी केलेल्या सहकार्यामुळे कसलाच अनुचित प्रकार घडला नाही. अखेर दोन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या महामार्गारील वाहतूक व व्यवसाय सुरळीतपणे सुरू झाले.
रविवार दिनांक ९ नोव्हेंबर वेळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील सोलापूर नागपूर महामार्गारील आशिव येथील टोलनाक्या जवळील लातूर व धाराशिव जिल्ह्यातील पंपाना सीएनजी पुरवठा करणा-या महानगर सीएनजी पंपावरून, लातूर शहरा जवळील महाराना प्रतापनगर गावा नजीकच्या पार्थ पंपावर जवळपास १ हजार २०० किलीे सीएनजी घेऊन निघालेला टँकर क्र. एमएच १४ केए २९२० हा निघाला होता. तो सोलापूर नागपूर महामार्गावरील लातूर शहरातील वळण रस्त्यावरून गरूड चौका पासून काही अंतरावरील यशोदीप हॉटेल समोर पोहचताच या टँकर मधून मोठ्या प्रशेरने सीएनजी लिकेज होण्यास सुरूवात झाली.
लिकेजच्या प्रेशरच्या आवाजामुळे ही बाब एका दुचाकी चालकाच्या लक्षात आली. तात्काळ त्यांने ही बाब टँकर चालक तानाजी सोनटक्के याच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर टँकर चालक सोनटक्के यांनी जैसे थे परस्थित टँकर रस्त्यात थांबून तेथून धुम ठोकली. परंतु पाठीमागून व समोरून येणा-या नागरिकांनी परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपली वाहने बाजूला काही अंतरावर घेत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली तर नागरीकांनी ही आजूबाजूची हॉटेल, धाबे व बारवरील भट्या विझवून ती बंद केली. तसेच विवेकानंद चौक पोलीस ठाणे व अग्निशमन दलास पाचारण केले व काही वेळातच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परंतु लिकिज सीएनजीचे प्रेशर इतके होते की जवळपास दोन किलोमीटर त्याचा आवाज येत होता.
अखेर दोन तासानंतर सुमारे ११:४५ वाजता टॅकर मधील सीएनजी पुर्णत: संपला व लातूरकरांनी सुटकेचा निश्वास घेतला व या मार्गावरील वाहतूक व व्यवसाय पुन्हा सुरळीतपणे सुरूवात झाली. मात्र या घटनेमुळे पोलीस व प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाल्याचे ही पहावयास मिळाले. याप्रसंगी कोणतीही भीषण घटना घडली नाही. पोलिसांनी तातडीने वाहतूक थांबवून नागरिकांना दूर ठेवले, त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. मात्र, कुतूहलाने बघ्यांची मोठी गर्दी या परिसरात झाली होती. सदरील घटने प्रकरणी तक्रार आली नसली तरी विवेकानंद चौक पोलीसांनी स्टेशन डायरीला सदर घटनेची नोंद केली आहे.

