लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटनेची बैठक दि. १९ मे रोजी क्षत्रिय कार्यालय येथे घेऊन संघटनेची पुनर्बांधणी करण्यात आली. लातूर शहर महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी अनेक दिवसापासून त्यांच्या मागण्यां प्रलंबित असल्यामुळे सर्व कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी एकत्रित येत संघटना पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे.
यामध्ये संघटनेचे प्रमुख सल्लागार म्हणून रमाकांत पिडगे, कलीम शेख, खदीर शेख व कायदेशीर सल्लागार म्हणून समाधान सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे तसेच संघटनेचे अध्यक्ष म्हणून रवी कांबळे यांची तर उपाध्यक्ष म्हणून बालाजी शिंदे, सचिव धोंडीराम सोनवणे, कोषाध्यक्ष अभिमन्यू पाटील व इतर पदाधिका-यांची निवड करण्यात आलेली आहे. संघटना पुनर्बांधणी मागील कर्मचा-यांचा उद्देश हा आहे की, मनपाच्या कर्मचा-यांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी तसेच मनपा कर्मचा-यांचे वेतन दरमहा १० तारखेपर्यंत करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसह कर्मचारी व अधिकारी एकत्र आले आहेत.
















