मुंबई : प्रतिनिधी
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात शंका नाही, असे ते म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यावर आता विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रितेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. या व्हीडीओमध्ये दोन वाक्यांत त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, असे त्यांनी हात जोडून म्हटले आहे. ‘महाराष्ट्राच्या मनामनात साहेब…’ असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हीडीओ पोस्ट केला आहे. रितेश यांच्या या व्हीडीओवर नेटक-यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हो दादा लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं नाव प्रत्येकाच्या मनात कोरलेलं आहे,’ असे एकाने लिहिले. तर ‘खरं आहे दादा.. कोणी काही मिटवू शकत नाही’ असे दुस-या युजरने म्हटले आहे.
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण हे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी लातूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल हे वक्तव्य केले होते. याच कार्यक्रमात महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येतंय की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मेळावा संपल्यानंतर मात्र रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नव्हता. त्यांनी तिथून लगेच निघून जाणे पसंत केले होते. आता त्यांच्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

