जळगाव : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाने संभाजीनगरहून नागपूरला जाताना बोगद्याच्या आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा आपत्कालीन सेवा नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा म्हणून महाराष्ट्र सरकारने समृद्धी महामार्गाची निर्मिती केली. परंतु, समृद्धी महामार्गावरच मूलभूत सुविधांची वानवा असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच प्रशासनाचे कान उपटले आहेत. त्यातच आता लुटमारीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारचे लक्ष वेधले आहे. प्रवाशांना सुरक्षितता देण्याची मागणीही त्यांनी केली आहे
नागपूर ते मुंबई ७०१ किलोमीटर असा समृद्धी महामार्ग आहे. फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं ५ जून रोजी लोकार्पण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे हा ७६ किमी मार्ग खुला करण्यात आला. एकीकडे या मार्गावर अपघाताचे सत्र सुरू असतानाच दुसरीकडे या महामार्गावर लूटमारीचे सत्र सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील डॉ. शिंगणे दाम्पत्याला औरंगबादमध्ये लुटण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ‘’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. ड्रीम प्रोजेक्ट म्हणून फक्त उद्घाटन करून मोकळे झालेले चालणार नाही तर, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार? असा सवाल रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
समृद्धी महामार्गाने संभाजीनगरहून नागपूरला जाताना बोगद्याच्या आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा आपत्कालीन सेवा नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांनी कृपया यात लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्या घराबाहेर जवळपास शंभर एक पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल, तुम्ही ज्या ताफ्यात असतात त्यात पन्नास एक पोलीस असतील. मग ज्या जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून आलात त्यांना तुम्ही वा-यावर का सोडले आहे? असा सवालही रोहणी खडसे यानी फडणवीस यांना केला आहे.