लातूर : प्रतिनिधी
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणा-या लातूर तालुक्यातील श्रीरामनगर, महमदापूर येथील श्रीराम विद्यालयात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून भव्य ‘वक्तृत्व स्पर्धा’ घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेचे हे ४ थे वर्ष होते. सदरील स्पर्धेमध्ये संस्थांतर्गत चालणा-या सर्व शाळा व महाविद्यालयातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. अजय पाटील तर उद्घाटक म्हणून माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार या उपस्थित होत्या. यावेळी श्रीराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वनिता सरवदे, महमदापूर गावचे सरपंच अंकुश बनसोडे, स्पर्धा समन्वयक प्रा. दादासाहेब लोंढे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या वतीने शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी कुंभार यांनी श्रीराम विद्यालय या शाळेची शिस्त, गुणवत्ता, स्पर्धा परीक्षेतील यश, विविध उपक्रमाबाबत संस्थेचे व शाळेचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगून विजेत्या स्पर्धकांचे व सहभाग घेणा-या सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. दुपार सत्रात झालेल्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, माजी कुलगुरु डॉ. मधुकर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये पूर्व प्राथमिक गटातून मांजरेश्वर हनुमान प्राथ. विद्यालय चिंचोलीराव वाडी येथील कार्तिक मोरे यांने प्रथम तर, हर्षवर्धन बनसोडे यांने द्वितीय क्रमांक पटकावला. प्राथमिक गटातून श्रीराम विद्यालय, ममदापूर येथील अपूर्वा बनसोडे हिने प्रथम येण्याचा मान मिळवला. अनुष्का सूर्यवंशी (विलासराव देशमुख विद्यालय सावरगाव) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. श्रीराम विद्यालय ममदापूर येथील अनघा मिटकरी,श्री गणेशनाथ विद्यालय सारसा येथील वैष्णवी वाघ तर श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय पिंपळगाव येथील वैष्णवी परीट यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
माध्यमिक गटातून श्री निळकंठेश्वर विद्यालय निवळी येथील जान्हवी सगर हिने प्रथम क्रमांक मिळवला. श्री मांजरेश्वर हनुमान विद्यालय चिंचोलीराव वाडी येथील पौर्णिमा मोरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तर श्री तावरजा विद्यालय शिऊर येथील चैत्राली माने व श्री रोकडेश्वर विद्यालय लातूर येथील राधा सोनवणे यांना उत्तेजनार्थ सहभाग पारितोषिक देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय गटातून श्री गणेशनाथ उच्च माध्यमिक विद्यालय,सारसा येथील श्रीकन्या भिसे व श्रीमती सुशीलादेवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय लातूर येथील आरती जाधव यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयीन गटातून चि.राहुल गोदाम (अभिनव अध्यापक महाविद्यालय लातूर) यांने प्रथम तर संस्कृती सुरवसे (श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर) हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.तर ऐश्वर्या सूर्यवंशी (अभिनव प्राध्यापक महाविद्यालय लातूर) हिला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट वक्ता’ हा किताब श्रीराम विद्यालय,श्रीरामनगर महमदापूर येथील श्वेता रमाकांत शेळके या विद्यार्थिनीने मिळवला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी संस्थांतर्गत चालणा-या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, प्राध्यापक, पालक, स्पर्धक, परीक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता स्पर्धा समन्वय समिती व श्रीराम विद्यालय, महमदापूर येथील सर्व स्टाफ यांनी खूप मेहनत घेतली. प्रास्ताविक प्रा. दादासाहेब लोंढे यांनी केले. मधुकर धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन सचिन रणदिवे व गीता जाधव यांनी केले.
















