25.9 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeलातूरलोकरंग लोककलेचा नवअध्याय, नवकिरण देणारा ठरला 

लोकरंग लोककलेचा नवअध्याय, नवकिरण देणारा ठरला 

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या मातीत वाढलेल्या भूमिपुत्रांनी लोककलेचे संवर्धन व्हावे, तिचे सौंदर्य नव्या पिढीत पोहोचावे, या सुंदर ध्येयाने ‘लोकरंग’ या भव्य लोककला महोत्सवाची अप्रतिम निर्मिती केली आहे. गणगवळण, भूपाळी,   वाघ्या-मुरळी, जागरण, लावणी, अभंग यांसारख्या लोकसंगीताच्या विविध छटांनी नटलेला हा कार्यक्रम केवळ करमणूक करणारा नसून लोककलेला नवे तेज देणारा, मनाला स्पर्श करणारा आणि विचारांना उजाळा देणारा ठरला.
दयानंद कला महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आणि रंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या कार्यक्रमाचा पहिला डाव काल अफाट रंगला. नवीन गीतांची साजिरी मालिका, त्यांना लाभलेले सुबक आणि हृदयाला भिडणारे संगीत संयोजन, आकर्षक वेशभूषा, नेत्रदीपक प्रकाशयोजना, मनात रेंगाळणारे स्वर, तसेच सचिन घोने यांचे नृत्यदिग्दर्शन—निखिल पवार, अपर्णा पवार, जान्हवी पाटील, अंजली कांदे आणि इतर कलाकारांचे मनमोहक नृत्याविष्कार या सर्वांनी कार्यक्रमाला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन ठेवले. सुत्रसंचालनाने लोककलेची सुंदर उकल करून कार्यक्रमाला प्रबोधनाची सुंदर छटा दिली.
ढोलकी, ढोल, पखवाज, तबला, हार्मोनियम, बासरी, टाळ, चिपळी, खंजिरी, हलगी या वाद्यांच्या सुरेल संगीतामुळे कार्यक्रमाला अप्रतिम ऊर्जा आणि भारदस्तपणा लाभला. या कार्यक्रमाच्या निर्मितीचे मोठे काम अखंड परिश्रम आणि प्रामाणिक निष्ठेने सांभाळणारे मयूर राजापूर हे या उपक्रमाचे मुख्य आधारस्तंभ ठरले. विक्रांत राजपूत यांच्या निवेदनाने आणि त्यांच्या मधुर गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भावूक स्पर्श केला. संकेत राजपूत यांच्या संगीत संयोजनाने कार्यक्रमाला अशी मोहक लय दिली की जणू अनुभवी संगीतकाराचा हातच या सा-या सुरावटींवर आहे.
बालाजी सुळ यांच्या निवेदनाने हास्याची हलकी, सुंदर किनार निर्माण झाली. निलेश राठोड आणि विनायक राठोड यांच्या मनापासून केलेल्या परिश्रमांनी ‘लोकरंग’ अधिकच ऊंचावला. हरी कुंभार, ज्योतिबा बडे, प्रतिज्ञा गायकवाड, जानकी, पूजा आणि इतर गायिकांच्या आवाजाने कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाला जिवंतपणा मिळाला. कार्यक्रमाच्या शुभारंभास दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव  रमेश बियाणी, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, संभाजी सुळ, इसरार सगरे, ओमप्रकाश झुरळे, सोनू डगवाले, अभय  कुलकर्णी, वेदपाठक तसेच लातूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दयानंद शिक्षण शिक्षण संस्था व इतर  दानशूर व्यक्तींनी दिलेले अर्थिकतेचे बळ, कलावंत, तांत्रिक साथीदार आणि आयोजनात योगदान देणा-या प्रत्येकाच्या प्रेम, मेहनत आणि कलेच्या ओढीतून लोककलेचा हा नवा अध्याय तेजाने उजळून निघाला आहे. आगामी काळात हा कार्यक्रम देश-विदेशात पोहोचो, लोककलेची ही सुंदर परंपरा जगभर दुमदुमो यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR