प्रयागराज : वृत्तसंस्था
आणीबाणीच्या काळापासून भारताने लोकसंख्या नियंत्रणाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही, ज्यामुळे देशाच्या शाश्वततेला मोठा धोका आहे, असे सांगत इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारताची लोकसंख्या वाढ आणि देशाच्या शाश्वततेवरील त्याचा संभाव्य परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी जमिनीची उपलब्धता आणि आरोग्य सेवेशी संबंधित गंभीर आव्हानांवरही भर दिला.
येथील मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एमएनएनआयटी) दीक्षांत समारंभात संबोधित करताना ते म्हणाले, भारताला लोकसंख्या, दरडोई जमिनीची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. आणीबाणीच्या काळापासून, आम्ही भारतीयांनी लोकसंख्या नियंत्रणाकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामुळे आपल्या देशाला टिकाव धरणे अवघड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीनसारख्या देशांमध्ये दरडोई जमिनीची उपलब्धता खूप जास्त आहे. मूर्ती यांनी पदवीधरांना उच्च आकांक्षा बाळगा, मोठी स्वप्ने पाहा आणि त्या स्वप्नांचे सत्यात रूपांतर करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रगतीत योगदान देणे ही ख-या व्यावसायिकाची जबाबदारी आहे, हे योगदान कठोर परिश्रम आणि समर्पणावर अवलंबून असते, असे ते म्हणाले.
भावी पिढीसाठी बलिदान आवश्यक
एका पिढीने भावी पिढीचे जीवन सुधारण्यासाठी अनेक बलिदान दिले पाहिजेत. माझ्या प्रगतीसाठी माझे आई-वडील, भावंड आणि शिक्षक यांनी मोठे बलिदान दिले आणि येथे प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपस्थिती हा त्यांचा त्याग व्यर्थ गेला नाही याचा पुरावा आहे. असे ते म्हणाले.