पुणे : प्रतिनिधी
कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी पुण्यामध्ये राज ठाकरेंनी पदाधिका-यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला. २०१४ पासून मतांची चोरी करूनच सत्ता राबवली जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर देशभरात वातावरण तापले आहे. बिहार निवडणुकीत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. आता राज ठाकरे यांनी सुद्धा सत्तार्धायांवर वोट चोरीचा आरोप केला आहे.
पुण्यात झालेल्या एका मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राहुल गांधी यांच्या आरोपांना पाठिंबा देताना राज ठाकरे म्हणाले, ‘‘आता राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलला आहे. मतांमध्ये गडबड होत आहे, मते चोरली जात आहेत. लोकांनी आपल्याला मते दिली, पण ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीत. मतांची चोरी करून हे सत्तेवर आले आहेत.
राज ठाकरे यांनी याआधी ईव्हीएम विरोधामध्ये भूमिका घेतली होती. ‘२०१६-१७ पासून मी सांगतोय की मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. ही बाब सोनीया गांधी, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोर मांडल्या होत्या, पण ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सुद्धा आपण केलं होतं, असे राज ठाकरे म्हणाले.
हा सगळा मतांचा गोंधळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राज ठाकरे म्हणाले, ‘महायुतीला २३२ जागांच्या आसपास बहुमत मिळाले, पण तरीही महाराष्ट्रात सन्नाटा का होता? कारण जे विजयी झाले त्यांना निकाल पचनी पडत नव्हते आणि जे पराभूत झाले त्यांना ते मान्य नव्हते. हा सगळा मतांचा गोंधळ होता. राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशी का केली नाही? कारण अशी चौकशी झाली तर गेल्या १०-१२ वर्षांतील गैरप्रकार उघड होतील.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादीवर लक्ष ठेवून, मतदार यादी बाबत प्रभागातील लोकांची जनजागृती करण्याच्या सूचना देखील राज ठाकरे यांनी पदधिका-यांना दिल्या

