Homeमहाराष्ट्रलोणार सरोवराच्या पाणीपातळीत वाढ

लोणार सरोवराच्या पाणीपातळीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणीपातळी वाढल्याने इथे असलेल्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. या सरोवरातील पाणी उपसा करण्यासाठी वन्यजीव विभागाची परवानगी आवश्यक असून त्यासाठी शुक्रवारी बैठक घेतली जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी (ता. १२ मार्च) विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले. शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. पाणी उपसा करण्यासाठी ४१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे. मात्र, वन्यजीव विभाग आणि पुरातत्व विभागात समन्वय नसल्याने पाणी उपसा रखडला आहे. त्यामुळे या परिसरात असलेले गायमुख, रामगया, पाप हरेश्वर मंदिर, कमलजा मंदिरासह सहा मंदिरे पाण्याखाली गेली असल्याचे खरात यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येथील झरे मोकळे झाले आहेत. त्यामुळे लोणार सरोवराची पाणी पातळी २० ते २५ फूट वाढली आहे. त्यामुळे इथली मंदिरे दर्शनासाठी खुली नाहीत. यासंदर्भात आयुक्त आणि जिल्हाधिका-यांबरोबर चर्चा करून तातडीने वन्यजीव विभागाची परवानगी घेण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात येईल. तसेच या परिसराच्या विकासासाठी ४३४ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून त्यापैकी १६८ कोटी खर्च झाला आहे. या सरोवरातील पाणी गुलाबी झाले असून क्षारयुक्त पाणी आहे. सरोवराची निगराणी करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार तत्पर असून लवकरच त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR