मुंबई : प्रतिनिधी
भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. लोणीकरांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची माफी मागावी, त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, अशा प्रकारचा संताप समाज माध्यमांवरून व्यक्त केला जात आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची दखल घेत त्यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे असून त्यांना समज देण्यात येईल, असे म्हटले आहे.
देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांची कानउघाडणी केली आहे. काल परतूर येथील एका कार्यक्रमात बोलताना बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकार आणि स्वत:च्या विरोधात टीका करणा-या तरुणांविषयी संताप व्यक्त केला होता.
कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात. हीच कार्टी कुचरवट्यावर बसून चर्चा करत असतात पण त्यांच्यापैकी काहींच्या आईचा पगार व बापाचे पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच दिले आहे. नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले, असे वादग्रस्त वक्तव्य लोणीकर यांनी केले. यानंतर राज्यभरातील विविध पक्षांचे नेते लोणीकर यांच्यावर तुटून पडले आहेत.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले, तेव्हा बबनराव लोणीकरांचे विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असे वक्तव्य केले असले तरीही अशा प्रकारचे विधान करायचा कुणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचे जे वक्तव्य आहे ते पूर्णपणे चुकीचे असून अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही. याची समज बबनराव लोणीकर यांना देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.