लातूर : प्रतिनिधी
देशातील वाढती हुकूमशाही, विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय आणि ‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि. २३ जुलै) आयोजित करण्यात आलेला ‘छात्रों की गूंज… विद्यार्थ्यांचा एल्गार कँडल मार्च’ लातूर बंदमुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. आता हे जनआंदोलन दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी माहिती लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या लातूर बंदला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता कायम ठेवण्यासाठी गुुरुवारचा नियोजित ‘कँडल मार्च’ आज काढण्यात येणार आहे. अभय साळुंके यांनी याबाबत माहिती देताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
ते म्हणाले की, देशात सध्या अराजकता माजली असून विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार सुरू आहेत. ‘नीट’ पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा; मात्र तसे न होता हे निर्दयी सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्य करत
आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने लक्ष्य केले गेले आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांचे आंदोलन ज्या दडपशाहीने मोडून काढण्याचा प्रयत्न झाला, तो लोकशाहीचा अपमान आहे. या हुकूमशाही, देशद्रोही आणि विद्यार्थीद्रोही सरकारचा आम्ही तीव्र धिक्कार करतो.
आज सायंकाळी ६ वाजता उद्योग भवन परिसरातील ट्युशन एरिया अष्टविनायक मंदिर येथून सुरू होईल आणि जिल्हा क्रीडा संकुलातील हुतात्मा स्मारक येथे समारोप होईल. या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भावनांना बळ देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख स्वत: सहभागी होऊन रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहितीही साळुंके यांनी दिली. या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि एन.एस.यू.आय. च्या सर्व पदाधिका-यांनी केले आहे.















