पुणे : प्रतिनिधी
राज्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे आता राज्य सरकार आणि वन विभाग पूर्णपणे सज्ज झाले आहेत. बिबट आणि माणूस यांच्यातला संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदीपासून रेस्क्यू सेंटरपर्यंतच्या उपाययोजना राबवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, या मोहिमेत वन विभागापुढे मोठी आव्हाने उभी आहेत. राज्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, बिबट-माणूस संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने ‘ऑपरेशन लेपर्ड’व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
राज्य सरकारकडून बिबट मादीची नसबंदी, नरभक्षक बिबट्यांना जेरबंद किंवा ठार मारणे आणि मानवी वस्तीत वावरणा-या बिबट्यांना जेरबंद करणे या तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उत्तर पुणे जिल्ह्यात दोन नवीन बिबट रेस्क्यू सेंटर उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, माणिकडोह निवारा केंद्रात नसबंदी शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर आणि विशेष यंत्रणा तयार ठेवण्यात येत आहे.

