22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रवसई-विरार महानगरपालिका निवडणुक : महायुतीत अंतर्गत तणाव

वसई-विरार महानगरपालिका निवडणुक : महायुतीत अंतर्गत तणाव

मुंबई : प्रतिनिधी
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भाजपवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

राजाराम मुळीक यांनी भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप करताना सांगितले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या नावाखाली सातत्याने बैठका होत होत्या. या बैठकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युतीधर्म पाळत सहभाग घेतला, चर्चा केल्या आणि समन्वयाची भूमिका ठेवली.

मात्र प्रत्यक्ष जागावाटपाच्या टप्प्यावर भाजपने एकही जागा न देता आश्वासनांवर पाणी फेरल्याचा आरोप त्यांनी केला. जो पक्ष आपल्या सहका-यांशी प्रामाणिक रहात नाही, तो मतदारांशीही कधीच प्रामाणिक राहू शकत नाही, असा थेट टोला त्यांनी लगावला. युती केवळ कागदावर होती, प्रत्यक्षात आम्हाला डावलण्यात आले, असेही मुळीक यांनी ठामपणे सांगितले.

या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर आणखी एक गंभीर आरोप करत म्हटले की, आमच्या पक्षाची ताकद नसती तर भाजपने आमचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले नसते. आमचे उमेदवार पळवले गेले, ही बाबच आमच्या पक्षाची ताकद दाखवणारी आहे, असा दावा करत मुळीक यांनी भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखादा पक्ष आमच्याशी युती करत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस थांबणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे वसई-विरारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, यामुळे थेट आणि तीव्र लढतीची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

दरम्यान, वसई-विरारमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही स्वतंत्र वाटचाल करण्याचे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाने आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्याची घोषणा केल्याने त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सुमारे १०० इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती, मात्र सध्याच्या घडामोडींमुळे त्या चर्चांवरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मात्र जागावाटपाची बोलणी पूर्ण झाल्याचे समजते आणि हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. परिणामी, वसई-विरारमध्ये आता बहुपक्षीय, तिरंगी किंवा चौथ्या आघाड्यांची शक्यता अधिक बळावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR