चारठाणा : येथील काही तरूण रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जिंतूर येथे चित्रपट पाहून घरी परतत असतांना त्यांना मालेगाव – खडकपाटी दरम्यान ३ मुले लिफ्ट मागत असल्याचे नजरेस पडली. त्यांनी गाडी थांबवून विचारपूस करत अकोली वसतीगृहातून पळून जात असलेल्या या मुलांना कुटुंबीयांच्या सुखरूप स्वाधीन केले. युवकांच्या या तत्परतेचे परिसरातून कौतूक होत आहे.
चारठाणा येथील अमजद पठाण, इम्रान शाह, अक्रम मिर्झा हे तिघे जिंतुर येथे चित्रपट पाहून कारने चारठाण्याकडे जात असतांना मालेगाव खडकपाटी दरम्यान जिंतुर तालुक्यातील ब्राम्हणगांव येथील अक्षय वाव्हुळे (वय १०), सूरज मोरे (वय ११) आणि पिराजी वाघ (वय १०) ही ३ मुले भेटली. त्यांनी चारठाण्याला जाण्यासाठी लिफ्ट मागितली. त्यांची चौकशी केली असता ही मुले अकोली वसतिगृहातून पळून जात असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, अमजद पठाण यांनी घटनेची माहिती चारठाणा सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी पुंड यांना दिली. त्यानंतर गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक खरात व सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी मुलांना चारठाणा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर मुलांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. आसाराम जाधव, सुनील वाघ हे नातेवाइक घटनास्थळी दाखल झाले. मुलांना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही मुले चारठाणा येथील तरूणामुळे व पोलीसांच्या तत्परतेमुळे सुखरूप घरी पोहचल्याने या सर्वांचे तत्परतेचे कौतूक होत आहे.
















