शिरूर अनंतपाळ : वांजरखेडा ते लातूर या मार्गावरील एस.टी. बसला मंगळवारी सकाळी सातच्या दरम्यान तळेगाव पाटीजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वांजरखेडा येथे मुक्कामास असलेली एस.टी.बस वांजरखेडा येथून लातूरकडे जाणारी एस.टी. बस (क्रमांक एमएच-१५ बीटी-१५६६) सकाळी सातच्या सुमारास तळेगाव पाटी येथे पोहोचली असता समोरून येणा-या ट्रॅक्टरने अचानक वळण घेतल्याने अपघात झाला. धडकेमुळे बसचा पुढील भाग नुकसानग्रस्त झाला. घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने मोठा अनर्थ टळल्याने प्रवासी व चालक सुटकेचा श्वास सोडत आहेत.

